
Sextortion : राष्ट्रवादीच्या आमदाराला सेक्सटोर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत
Sextortion : मोहोळ विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांना सेक्सटोर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माने हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत.
सायबर चोरट्यांनी आमदार माने यांचा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावरुन मिळवला आणि त्यांना अश्लील मेसेज पाठवायला सुरुवात केली आणि त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांना भुरळ पडण्याचा प्रयत्न केला. आरोपीला पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने राजस्थान येथील भरतपूर येथून अटक केली आहे.
रिझवान खान (२४) असे आरोपीचे नाव असून तो राजस्थान मधील आहे. आरोपी खान याने आत्तापर्यंत ८० जणांना असे फोन केले आहेत हे तपासातून निष्पन्न झाले असून त्याच्याकडून आत्तापर्यंत ४ मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
यशवंत माने यांचा सायबर चोरट्याने सोशल मीडियावरुन नंबर शोधला आणि त्यांना sextortion च्या जाळ्यात ओढले. जानेवारी महिन्यात माने यांच्या मोबाईल नंबरवर एक अश्लील मेसेज आला आणि अश्लील व्हिडिओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी त्यांना देण्यात आली तसेच १ लाख रुपयांची खंडणी मागितली.
"मी कुठल्या ही व्यक्तीशी बोललो नाही. तसेच मला लागोपाठ ७०-८० मेसेज करण्यात आले होते. १ लाख रुपयांची खंडणी मला मागितली होती यामुळे ही तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दाखल केली होती," असे माने म्हणाले.
माने हे पुण्यात वास्तव्यास असून त्यांनी पुण्यातील पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांक तपासून तो राजस्थान मधील असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्या ठिकाणी पथक पाठवले. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राजस्थान मधील भरतपूर या जिल्ह्यात ७ दिवसांसाठी तळ ठोकला आणि या आरोपीला ताब्यात घेतले.