अजित पवार आले, आता चोख हिशेब होणार!

ज्ञानेश सावंत
सोमवार, 30 डिसेंबर 2019

राष्ट्रवादीत बंड करीत भाजपशी सलगी करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची घेतलेले अजित पवार आता पुन्हा नव्या सरकारमधील उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत.

पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेते, अधिकाऱ्यांनो आता सकाळी सात वाजल्यापासूनच बैठकांचा सपाटा असेल, भल्या सकाळीच बैठक लावण्याचा निरोप येईल, तुमच्याकडच्या जबाबदारीचा चोख 'हिशेब' घेतला जाईल, बेजबाबदारपणातून कानउघाडणीही होऊ शकते, अर्धवट माहितीची "फाइल' देतानाच ती तकडाफडकी तुमच्याच दिशेने परत येईल...आता हे सगळे काही घडणार आहे. त्याच्या धास्तीने नेते, अधिकाऱ्यांना रोजच प्रचंड "अलर्ट' राहावे लागेल...कारण नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खास "स्टाइल'मधील आढावा बैठकांचा झंझावात पुण्यात सुरू होईल !

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादीत बंड करीत भाजपशी सलगी करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची घेतलेले अजित पवार आता पुन्हा नव्या सरकारमधील उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. विधानभवनाच्या आवारातील शाही कार्यक्रमात पवार यांनी पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, "आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री होऊ', असा विश्‍वास अजित पवार यांनी दोन आठवड्यापूर्वीच पुण्यात व्यक्त केला होता.

मंत्रिमंडळ विस्तारातील 36 नावे जाहीर; पाहा आहेत कोण-कोण?

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे सरकार आणण्यासाठी या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते वाटाघाटक्ष करीत असतानाच अजित पवार यांनी बंड पुकारले आणि भाजपला साथ देत उपमुख्यमंत्री झाले. त्यावरून राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांत प्रचंड खल झाला. अजित पवारांच्या पवित्र्यानंतरही भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्याचा इरादा पक्का केलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आक्रमकतेपुढे अजित पवारांचे बंड शमले. त्यानंतरच्या राष्ट्रवदीाच्या कार्यक्रमांत "दादां'नी उपमुख्यमंत्री व्हावे, गृह खाते सांभाळावे, पुण्याचे पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवावे, अशा आग्रही मागण्या त्यांच्या समर्थकांनी लावून धरल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आले आहे.

शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा

मंत्रीमंडळात नसतानाही कार्यकर्त्यांना सकाळी झोपेतून लवकर उठण्याचा सल्ला देताना पुण्यातील कारभार आपल्याकडेच राहणार आहे, असे अजित पवार यांनी सूचित केले होते. तर, केवळ आमदार असताना पुण्यात शनिवारी कालवा समितीची बैठकीच महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्यावर अजित पवार संतापले होते. "या पुढे बैठकांना येताना सगळी माहिती हवी' अशा शब्दांत अजित पवार यांनी गोयल यांना इशारा दिला होता. उपमुख्यमंत्रीपदानंतर पुण्याचा पालकमंत्रीपदाचा मानही अजित पवार यांनाच मिळणार असल्याने भाजपच्या ताब्यातील पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिकांसह सरकारी "बाबुं'वर आपली हुकूमत गाजवणार असल्याचे स्पष्ट आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar may be guardian minister in Pune