Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीच्या नेत्याने दिला भाजपला पाठिंबा!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

कंद यांच्यात धडाडी आहे, भाजप त्यांचा योग्य तो सन्मान नक्की ठेवेल, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली आहे.

पुणे : सध्याचं राजकारण म्हणजे अळवावरचं पाणी झालंय. कारण इथं कोण, कधी, कुणाला पाठिंबा देईल किंवा पाठिंबा काढून घेईल, हे सांगता येत नाही. राज्यभरात दोन पार्ट्या एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, असे चित्र असताना एका पार्टीच्या नेत्याने आपल्या प्रतिस्पर्धी पार्टीच्या नेत्याला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आता वेगळीच रंगत निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी भाजपला पाठिंबा दर्शविला आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सोमवारी (ता.7) त्यांनी हा निर्णय घेऊन सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकले आहे. कंद यांनी  शिरूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांना पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.

प्रदीप कंद हे शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार होते. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

कंद यांनी रविवारी (ता.6) सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपला मनोदय बोलून दाखवला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार येण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आपण पाठींबा देत आहोत. शिरूरमधून भाजपाचे उमेदवार बाबूराव पाचार्णे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्यासाठी आपण संपूर्ण ताकद पणाला लावू, असे आश्वासन कंद यांनी यावेळी दिले.

कंद यांच्यात धडाडी आहे, भाजप त्यांचा योग्य तो सन्मान नक्की ठेवेल, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली आहे. लवकरच मेळावा आयोजित करून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कंद हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आमदार राहुल कुल, भाजपचे पुणे शहर सरचिटणीस गणेश बीडकर या वेळी उपस्थित होते.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरात पाच ठिकाणी युतीसमोर बंडखोरांचे आव्हान

- आरेतील झाडं, भाजपमधली 'मुळं' मुख्यमंत्र्यांनी उखडली; राष्ट्रवादीचा ट्विटर टोला!

- भारतावर हल्ल्यासाठी तीन संघटना एकत्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Pradeep Kand supports BJP leader Baburao Pacharne for Maharashtra Assembly election 2019