Diwali Special: तेरा वर्षांच्या दोन मित्रांनी तीन आठवड्यांत विकला सव्वाशे किलो फराळ

नीला शर्मा
Wednesday, 11 November 2020

सुरवातीला भांडवल म्हणून पालकांकडून घेतलेले पैसे प्रत्येक वेळी परत करून वर नफा मिळवता आला. हे धडे, ही गणितं पुस्तकांपेक्षा अनुभवातून शिकता येतात. आम्हाला हे करावसं वाटलं आणि यशस्वीपणे करता आलं. यात खूप कष्ट आहेत, पण भरपूर आनंदही आहे.

एरवी खाऊ घेताना दुकानदाराला पैसे देणं, ही फक्त एकतर्फीच प्रक्रिया माहीत असलेल्या त्या मुलांनी विक्रीचा अनुभव घ्यायचं ठरवलं. दिवाळीच्या निमित्ताने फराळविक्रीची समोर आलेली संधी हेरली. पुण्यातील क्रिश अमित गुजराती आणि कृष्णा अशोक तिडके या तेरा वर्षांच्या दोन मित्रांनी गेल्या तीन आठवड्यांत चक्क सव्वाशे किलो फराळ विकत आत्मविश्वास कमावला आहे.

पुरंदरच्या सीताफळाचा हंगाम दिड महिना अगोदरच गुंडाळला जातोय!​

क्रिश म्हणाला, "आम्हा दोघांना मार्केटिंग शिकावसं वाटलं. याबद्दल काही तरी वाचणं किंवा ऐकणं हे मार्गदर्शन मिळवण्यापुरतं ठीक आहे. पण थेट अनुभवातून मिळतील ते धडे आपल्याला जास्त उपयोगी पडतील, असा विचार आम्ही केला. माझे मामा नाशिकमध्ये राहतात. ते चिवडा, चकली आणि शंकरपाळी बनवून विकतात. मस्त चवीचा हा फराळ आपण विकून पाहायचं ठरवलं. चकली व चिवड्याची प्रत्येकी अर्धा किलोची आणि शंकरपाळीची दोनशे ग्रॅमची पाकिटं बनवली. ओळखीतल्यांना या पदार्थांची चव देत वैशिष्ट्यं सांगितली. जवळपासच्या दुकानांमध्ये माल ठेवायला तिथल्या मंडळींना पटवलं. एका काकांनी पॅकिंगमधली सुधारणा सुचवली. हा महत्त्वाचा धडा होता. मामाकडून माल विकत घेणं, त्यात वाहतूक व पॅकिंग खर्च तसंच श्रमाचे पैसे जोडून आम्ही विक्रीचा दर निश्‍चित केला. दुकानदारांकडून जास्त माल खपतो म्हणून त्यांना कमी दरात माल दिला. हे सगळं शिकताना मोठं आव्हान यशस्वी करण्याचं समाधान मिळतं आहे.''

'सरकार पाडणे ही आमची संस्कृती नाही, पण...'; वाचा काय म्हणाले चंद्रकांत पाटील

कृष्णा याने सांगितलं की, एक महिना अगोदरपासून आम्ही भाजीपाला विकायचा अनुभव घेत आहोत. सेंद्रिय भाज्या होलसेलमध्ये आणणाऱ्या एकाशी ओळख झाली. त्यांच्याशी बोलून आम्ही काम सुरू केलं. आमची सोसायटी आणि जवळपास राहणाऱ्या लोकांना आम्ही आधी भेटून याबद्दल सांगितलं. त्यांना ऑनलाइन फॉर्मचं स्वरूप समजावून दिलं. त्यावरून त्यांनी नोंदवलेल्या ऑर्डरप्रमाणे आम्ही भाजीची पाकिटं त्यांना नेऊन देतो. मंगळवार, गुरुवार व रविवार त्यासाठी ठरवला आहे. त्या त्या दिवशीच्या भाज्यांचं दरपत्रक ऑनलाइन पाठवतो. हे छान जमल्यामुळे आता फराळविक्रीचा अनुभव घेत आहोत.

अभिमानास्पद! पुणे विद्यापीठातील ८ शास्त्रज्ञांना स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचं मानांकन

लवकरच आणखी एका मित्राला सोबत घेऊन तयार सॅलड पुरवायचा विचार चालला आहे. याच्या आधी उटणं तयार करून विकणं, शाळेत स्नेहसंमेलनाच्या वेळी चॉकलेट बनवून विकणं, प्रदर्शनात मिसळ विकणं असे प्रयोग आम्ही करत आलो आहोत. सुरवातीला भांडवल म्हणून पालकांकडून घेतलेले पैसे प्रत्येक वेळी परत करून वर नफा मिळवता आला. हे धडे, ही गणितं पुस्तकांपेक्षा अनुभवातून शिकता येतात. आम्हाला हे करावसं वाटलं आणि यशस्वीपणे करता आलं. यात खूप कष्ट आहेत, पण भरपूर आनंदही आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neela Sharma write an article about two friends who sold Diwali Faral