अभिमानास्पद! पुणे विद्यापीठातील ८ शास्त्रज्ञांना स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचं मानांकन

SPPU_Scientist
SPPU_Scientist

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून संशोधनाला नेहमीच चालना दिली जाते. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब आता जागतिक स्तरावर उमटले आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने जगभरातील सर्वोत्कृष्ट दोन टक्के शास्त्रज्ञांची यादी जाहीर केली. त्यात पुणे विद्यापीठातील आठ प्राध्यापक शास्त्रज्ञांना मानांकन मिळाले आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र गच्चे, गणित विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा गेज्जी, भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विकास मठे, इन्स्टिट्यूट ऑफ बायॉइन्फॉर्मेटिक्‍स अँड बायोटेक्‍नॉलॉजीच्या संचालक डॉ. स्मिता झिंजर्डे, केमिकल फिजिक्‍स विषयात संशोधन करणारे डॉ. सुधीर गद्रे, मॅथेमॅटिकल फिजिक्‍समध्ये संशोधन करणारे डॉ. अविनाश खरे आणि डॉ. विश्वास काळे अशा आठ जणांना नामांकन मिळाले आहे. भूषण पटवर्धन यांनी मेडिसिनल अँड बायोमॅलिक्‍युलर केमिस्ट्री या विषयात संशोधन केले आहे. 

देशभरातून दीड हजार जणांची निवड 
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील डॉ. जॉन पीए इयॉन्निडीस यांच्या पुढाकाराने जगातील प्रतिष्ठित जर्नल्समध्ये ज्यांचे संशोधन प्रकाशित झालेले आहेत आणि जे परिणामकारक आहेत अशा एक लाख शास्त्रज्ञांची यादी तयार केली आहे. त्यातही सर्वोत्तम अशा दोन टक्के शास्त्रज्ञांची स्वतंत्र यादी पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स बायोलॉजी या जर्नलमध्ये नुकतीच प्रकाशित केली. त्यात भारतातील 1 हजार 594 शास्त्रज्ञांचा समावेश आहे. पुणे विद्यापीठातील सहा जणांना या यादीत मान मिळवला आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेसह संशोधन क्षेत्रातील गुणवत्ताही पुणे विद्यापीठाने स्पष्ट केली आहे. 

"पुणे विद्यापीठात इनोव्हेशन पार्कसह इतर संस्थांच्या माध्यमातून संशोधनासाठी योजना राबविल्या जात असल्याने पुणे विद्यापीठाचे यापुढेही चांगली कामगिरी होईल. तसेच देशभरातील विद्यापीठांमध्ये संशोधन वाढायला  पाहिजे. मला मिळालेले नामांकन हे माझ्या एकट्याचे नसून माझ्यासोबत काम केले सर्व सहकारी, विद्यार्थी यांचा यात मोलाचा वाटा आहे."
- डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, यूजीसी. 

"स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या टाॅप दोन टक्के मध्ये मानांकन मिळाल्याने आम्ही जे मुलभूत संशोधन करत आहोत, त्यास ऊर्जा मिळालेली आहे. पुणे विद्यापीठाकडून उपलब्ध होणाऱ्या सुविधांमुळे हा मान मिळाला आहे. यापुढेही संशोधनातून पुणे विद्यापीठाचे नाव पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू."
- डाॅ. राजेंद्र गच्चे, विभागप्रमुख, जैवतंत्रज्ञान विभाग

" गेल्या वीस वर्षापासून मी विद्यापीठात कार्यरत आहे. मरीन बायोटेक्नॉलॉजी, एंव्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी, नॅनो बायोटेक्नॉलॉजी या विषयांमध्ये काम केले. हे संशोधन प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. हे सर्व काम पुणे विद्यापीठामध्ये राहून केले आहे. त्यास स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीचे मानांकन मिळाले याचा आनंद आहे."
-  डॉ. स्मिता झिंजर्डे, संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ बायॉइन्फॉर्मेटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजी

"पुणे विद्यापीठात राहून जे संशोधन केले त्याचे जागतिक पातळीवर नि:पक्षपणे मूल्यांकन केले गेले त्यामुळे केलेल्या कामाचे समाधान आहे. तसेच जागतिक पातळीवर आपण सर्वांसोबत आहोत याचा आनंद वाटला. माझे मुख्यता संशोधन हे अप्लाइड मॅथेमॅटिक्स आणि त्या संबंधित इतर विषयांमध्ये झालेले आहे."
- डॉ. वर्षा गेज्जी, विभागप्रमुख, गणित

मुलभूत संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेतल्याचा मला निश्‍चितच आनंद आहे. आपण जे काम करतो त्याचा जागतिक स्तरावरील उपयोजीतता आणि महत्त्व यामुळे अधोरेखेत होते. 
- डॉ. विकास मठे, भौतिकशास्त्र विभाग

या गोष्टींवर ठरले मानांकन 
- संशोधन कोणत्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. 
- किती संशोधन पेपर प्रसिद्ध झाले. 
- संशोधनाचा जागतिक स्तरावर शास्त्रज्ञांनी संदर्भ म्हणून केलेला वापर 
- 1960 पासून ते 2020 पर्यंतच्या संशोधनाचा विचार 
- 22 विज्ञान विषय आणि 176 उपविषयांमध्ये केलेल्या संशोधनाचा विचार 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com