नीरा विक्री व्यवसाय झाला ‘थंड’

Nira
Nira

४० ते ५० टक्के केंद्रे बंद; खप तीन हजार लीटरवरून दीड हजार लीटरवर
पुणे - कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्चपासून लॉकडाउन काळात अनेक व्यवसायांवर विपरित परिणाम झाला. अनलॉकनंतरही हे व्यवसाय पूर्वीप्रमाणे उभे राहू शकले नाहीत. यातलाच एक व्यवसाय म्हणजे नीरा विक्री. पूर्वी दिवसा अडीच ते तीन हजार लिटर नीराची विक्री व्हायची, ती आता दीड हजार लिटरच्या आसपास पोचली आहे. ३८६ नीरा विक्री केंद्रांपैकी ४० ते ५० टक्के केंद्रे बंद आहेत. उन्हाचा चटका वाढला असूनही नीराला मागणी मात्र खूप कमी आहे.

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर, मावळातील तळेगाव दाभाडे, कोळिये तसेच खेड तालुक्यातून नीरा सकाळी सात वाजता शहरात पोचतो. याचे व्यवस्थापन नीरा सहकारी सोसायटी लिमिटेड ही संस्था पाहते. या संस्थेची स्थापना दोन डिसेंबर १९५३ रोजी झाली होती. वर्षाकाठी सुमारे एक कोटीची उलाढाल आहे. मात्र, लोकडाउनमुळे व त्यानंतर निर्बंध यामुळे गेले वर्ष पूर्ण नुकसानीत गेले. नीरा काढणे शंभर टक्के बंद होते. झाडे खराब होऊ नये म्हणून डांबर लाऊन ठेवण्यात आला होता, अशी माहिती सोसायटीचे माजी कार्यकारी संचालक व विद्यमान संचालक चंद्रकांत दोमाले यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दर वाढविण्याची मागणी
सध्या नीराचा २०० मिलि ग्लास १० रुपये व ३०० मिलि ग्लास १५ रुपयांना विकला जातो. हेच दर अनुक्रमे १५ व २० रुपये करावे, अशी मागणी आहे. मात्र, त्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळाची मंजुरी लागते. सोसायटीच्या केंद्रावर (जुने जिल्हा परिषद कार्यालय) कागदी ग्लास वापरले जातात. त्याचा दीड-दोन रुपये खर्च होतो. काही ग्राहकांना कागदी ग्लास नको असतात, त्यांना काचेच्या ग्लासात नीरा दिला जातो. त्यासाठी गरम पाण्यात ते धुतले जातात. हा खर्च पाहता दरवाढ होणे गरजेचे असल्याचे सोसायटीचे कायदा सल्लागार रमेश भंडारी म्हणाले.

नीरा म्हणजे काय?
शिंदी, ताडमाड झाडापासून मिळणारा ताजा रस म्हणजे नीरा. शिल्लक राहिलेला नीरा फेकून द्यावा लागतो. त्याचा काहीही वापर होत नाही.

नीरा पिण्याचे फायदे

  • स्वास्थवर्धक पेय
  • शरीरवृद्धीला सहाय्यक
  • थकवा दूर होतो
  • रक्त वाढते
  • पचन शक्ती वाढते
  • पोटातील विकार नाहीसे होतात
  • मुत्राशयाचे विकार नाहीसे होतात
  • सी व्हिटॅमिन दातांमधील हिरड्या मजबूत करत

नीरामधील पौष्टिक मूल्य

  • साखर 
  • कॅल्शिअम
  • फॉस्फरस 
  • एसकारविक ॲसिड
  • लोहतत्व
  • थियॅमीन
  • निकोटीनोक ॲसिड
  • रायबोफ्लोविन
  • प्रोटीन

‘नीरा’चे गणित

  • एका झाडापासून तीन महिन्यात फक्त ४५ दिवस नीरा काढला जातो
  • ज्याच्याकडून झाड घेतले जाते त्यांना प्रती झाड २५० ते ३०० रुपये मिळता
  • एका झाडासाठी खर्च सुमारे ५०० रुपये
  • सुमारे ५०० कुटुंबे नीरा व्यवसायावर अवलंबून
  • नीरा विक्री करणाऱ्याला ग्लासमागे दोन रुपये कमिशन
  • माल संपल्याचा फोन आल्यास केंद्रावर नीरा पोच केला जातो
  • केंद्रासाठी डिपॉझिट (परत न होणारे) पाच हजार
  • शहरात दोन केंद्रामधील अंतर दीड किमी. तर महामार्गावर दोन किमी.

या व्यवसायाला चांगल्या संधी आहेत. बारामतीतील सुपे येथे दोन एकर जागा घेतली आहे. सरकारनेही झाडे लावण्यासाठी सुमारे २० एकर जमीन उपलब्ध करून दिल्यास मदत होईल. अनुदान देण्याचाही विचार सरकारने करायला हवा. नीरापासून गुळासारखे बायप्रोडक्ट तयार केल्यास त्याला चांगली मागणी आहे. सोसायटीच्या भविष्यात अनेक योजना आहेत. मात्र, त्याला सरकारी मदतीची गरज आहे.
- रमेश भंडारी, कायदा सल्लागार, नीरा सहकारी सोसायटी, पुणे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com