डिझेल ओव्हर फ्लो झाले पण, अधिकाऱ्यांनी पाहिले नाही

प्रफुल्ल भंडारी 
Wednesday, 4 November 2020

दौंड रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या डिझेल टाक्यांमधून डिझेल ओव्हर फ्लो झाले परंतु रेल्वे प्रशासनाला ते दिसलेले नाही. घटनेच्या सात दिवसानंतरही या बाबत कोणावरही कारवाई करण्यात आली नाही.

दौंड (पुणे) : दौंड रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या डिझेल टाक्यांमधून डिझेल ओव्हर फ्लो झाले परंतु रेल्वे प्रशासनाला ते दिसलेले नाही. घटनेच्या सात दिवसानंतरही या बाबत कोणावरही कारवाई करण्यात आली नाही.

हेही वाचा : पीएमपीच्या ६० टक्के बस मार्गांवर; रोजचे एवढे प्रवासी करतात प्रवास

रेल्वे स्थानकावर डिझेल साठवणूक व वितरण करण्याकरिता रिटेल कंझ्यूमर डेपो (आरसीडी) असून तेथे लोणी काळभोर येथून ट्रक-टॅंकरने आणले जाणारे डिझेल सात टाक्यांमध्ये साठविले जाते. टाक्यांची एकूण साठवण क्षमता ४ लाख २४ हजार लिटर इतकी आहे. सदर टाक्यांमधील डिझेल दौंड-मनमाड, दौंड-सोलापूर, दौंड-पुणे व दौंड-बारामती दरम्यान धावणाऱ्या प्रवासी आणि मालगाड्यांच्या इंजिनमध्ये भरले जाते.

२९ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास टाकी क्रमांक सहा मधील डिझेल ओव्हर फ्लो झाल्याने साधारणपणे तीन हजार लिटर डिझेल वाया गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मानवी चुकीमुळे डिझेल ओव्हर फ्लो झाले का ठरवून ओव्हर फ्लो करण्यात आले ?, याची अंतर्गत चौकशी होणे गरजेचे आहे. 

सहायक विभागीय यांत्रिकी अभियंता एच. एम. नाटेकर यांना या बाबत विचारले असता त्यांनी घटनेच्या दिवशी सुट्टीवर असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. 

हेही वाचा :  पुण्यात उद्योगचक्राला गती; उत्पादनक्षमता आता ७२ टक्के
 
अत्यंत किरकोळ प्रमाणात डिझेल टाकी बाहेर पडले आहे. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाकडे कोणताही तक्रार किंवा चौकशी अर्ज आलेला नाही. -तेजप्रकाश पाल, निरीक्षक - दौंड रेल्वे सुरक्षा दल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No action in diesel overflow case