रेशनवर साखर, डाळ मिळेना !

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

पूर्वी दिवाळी आली की रेशनवर हरभरा डाळ, साखर, रवा-मैदा, पामतेल दिले जायचे. घरी बेसन, रव्याचे लाडू, करंजी असे गोडधोड बनवायचो. आता रेशनवर केवळ गहू-तांदूळ मिळतो. साखरेच्या पोत्यांनी गोदामे भरलीत. पण, रेशनवर साखर नाही. किमान दिवाळीत हरभरा डाळ, साखर, रवा-मैदा, पामतेल पुन्हा सुरू करा. दिवाळी तोंडावर आली. पण, रेशनवर साखर, हरभरा डाळ काही आली नाही. ती वेळेवर मिळाली, तर आमची दिवाळी गोड होईल...’ गृहिणी शिवानी कोठावळे ‘सकाळ’शी बोलत होत्या.

पुणे - पूर्वी दिवाळी आली की रेशनवर हरभरा डाळ, साखर, रवा-मैदा, पामतेल दिले जायचे. घरी बेसन, रव्याचे लाडू, करंजी असे गोडधोड बनवायचो. आता रेशनवर केवळ गहू-तांदूळ मिळतो. साखरेच्या पोत्यांनी गोदामे भरलीत. पण, रेशनवर साखर नाही. किमान दिवाळीत हरभरा डाळ, साखर, रवा-मैदा, पामतेल पुन्हा सुरू करा. दिवाळी तोंडावर आली. पण, रेशनवर साखर, हरभरा डाळ काही आली नाही. ती वेळेवर मिळाली, तर आमची दिवाळी गोड होईल...’ गृहिणी शिवानी कोठावळे ‘सकाळ’शी बोलत होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात अंत्योदय आणि प्राधान्यक्रम योजनेंतर्गत गहू आणि तांदूळ दिला जातो. गहू दोन रुपये आणि तांदूळ तीन रुपये किलो दराने मिळतो. ऑक्‍टोबरचे धान्य वाटप जवळपास पूर्ण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वितरण नोव्हेंबरपर्यंतच सुरू राहणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केशरी कार्डधारकांना जुलैचा सवलतीच्या दरातील गहू-तांदूळ अजून मिळालेला नाही. राज्य सरकारने केशरी कार्डधारकांसाठी देण्यात येणाऱ्या गहू-तांदळासाठी फरकाची रक्‍कम नुकतीच केंद्राकडे जमा केल्याची माहिती आहे. त्यामुळे केशरी कार्डधारकांना नोव्हेंबरमध्ये धान्य मिळण्याची शक्‍यता आहे. गहू आठ रुपये किलो आणि तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होणार आहे.

पुणेकरांनो, उद्याने खुली होणार पण...; महापालिका आयुक्तांचा आदेश वाचाच

पालकमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष
उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी १५ दिवसांपूर्वी विभागीय आयुक्‍त कार्यालयात बैठक घेतली होती. त्यात सणासुदीत दिवाळीपूर्वी नागरिकांना रेशनवर धान्य उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. रेशनवर साखर, डाळी मिळणार का, हा प्रश्‍नही अनुत्तरित आहे. यासंदर्भात अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या अधिकारी अस्मिता मोरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पुणे : छाप्यावेळी हाती आलं घबाड; बड्या राजकीय व्यक्तीशी संबंधित कागदपत्रे पोलिसांच्या हाती  

रेशन कार्डधारकांना दिवाळीपूर्वी धान्य, साखर, हरभरा डाळ, पामतेल मिळाले तर सामान्य नागरिकांची दिवाळी गोड होईल. रेशनवरील धान्याबाबत खासदार आणि मंत्री संसदेत प्रश्‍न मांडत नाहीत. राज्यातही तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगितले जाते. सरकारच्या धोरणाबाबत रेशन दुकानदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. दिवाळीनंतर बरेच रेशन दुकानदार व्यवसाय बंद करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत.
- गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे शहर

कोरोनामुळे सहा-सात महिन्यांपासून रोजगार नाही आणि पैसाही नाही. त्यामुळे घरात सर्वकाही जेमतेम सुरू आहे. सरकारने रेशनवर साखर, तेल आणि डाळी उपलब्ध करून द्याव्यात. पामतेल ५५ रुपये आणि साखर २० रुपये किलो दराने द्यावी. किमान दिवाळीत तरी गोडधोड खाऊ द्या. 
- साक्षी भागवत, गृहिणी, कात्रज

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No sugar or dal on ration