पुणे : छाप्यावेळी हाती आलं घबाड; बड्या राजकीय व्यक्तीशी संबंधित कागदपत्रे पोलिसांच्या हाती

IMP_Documents
IMP_Documents

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह त्याच्या नातेवाइकांच्या घरी कोथरूड पोलिसांनी घातलेल्या छाप्यात महत्त्वपूर्ण दस्तऐवज पोलिसांना आढळून आला आहे. त्यामध्ये महत्त्वाचे दस्तऐवज, माहिती अधिकारातील अर्ज, नामांकित बांधकाम व्यावसायिक, शासकीय ठेकेदारांची कागदपत्रे आणि राजकीय व्यक्तींशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये आणखी महत्त्वाची माहिती सापडण्याची शक्‍यता आहे. 

कोथरूड पोलिस ठाण्यामध्ये रवींद्र बऱ्हाटेसह दीप्ती आहेर, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन, अमोल चव्हाण यांच्याविरुद्ध खंडणी, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांनी फिर्याद दिली आहे. याबरोबरच बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध अन्य पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. मात्र बऱ्हाटे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर कोथरूड पोलिसांनी बऱ्हाटेसह त्याच्या नातेवाइकांच्या घरांवर छापे घालून गुन्ह्यांशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली. 

इथे घातले पोलिसांनी छापे 
बऱ्हाटे याचे लुल्लानगर येथील 'मधुसुधा अपार्टमेंट'मधील घर, धनकवडीतील सरगम सोसायटीत नूतनीकरण सुरू असलेला 'रायरी' बंगला, बऱ्हाटेची मुलगी चालवीत असलेली ई-झेड फार्मासुटिकीकल्स शॉप, मुलीच्या सासऱ्याचे महर्षीनगरमधील झांबरे इस्टेटमधील घर, छत्रे सभागृहाजवळील बहिणीचे घर, बिबवेवाडीतील निशिदा सोसायटीतील मेव्हण्याचे घर अशा सहा ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून झडती घेण्यात आली. 

महत्त्वाची कागदपत्रे, दस्तऐवज पोलिसांच्या हाती 
नूतनीकरण सुरू असलेल्या धनकवडीतील 'रायरी' बंगल्यात महत्त्वाची कागदपत्रे आढळली आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या दस्तांच्या फाईल्स, माहिती अधिकारातील अर्ज, माहिती अधिकारात प्राप्त केलेल्या माहितीची कागदपत्रे, पुणे आणि मुंबई येथील नामांकित बांधकाम व्यावसायिक, शासकीय ठेकेदार यांच्याशी संबंधित कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, महसूल विभाग कार्यालय, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालय, आयकर कार्यालय, वेगवेगळ्या ग्रामपंचायतींची कार्यालये आणि तहसीलदार कार्यालये या स्वरूपाची शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांशी केलेला पत्रव्यवहार, संबंधित कार्यालयाकडून प्राप्त केलेल्या माहितीची कागदपत्रे, वेगवेगळ्या राजकीय व्यक्‍तींशी संबंधित कागदपत्रे तसेच कुलमुखत्यारपत्रे, खरेदीखते, करारनामे, भागीदारीपत्रे आणि इतर दस्तऐवज अशा स्वरूपाची मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आढळून आली आहेत. या कागदपत्रांद्वारे पुढील तपास केला जाणार असल्याचे कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com