Lockdown Effect : नोटरीचा शिक्का अजूनही पुसटच!

Notary
Notary

पुणे : लॉकडाऊन काळात नोटरीचे काम पूर्ण थांबले होते. अनलॉकनंतर चांगल्या प्रमाणात प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्या पूर्वीच्या तुलनेत केवळ 30 ते 40 टक्के नोटरी केली जात आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यात आर्थिक घडी पूर्ण विस्कटली आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर अवघड होऊन जाईल, अशी भीती नोटरी करून देणारे ऍड. संजय रणधीर यांनी व्यक्त केली.

ऍड. रणधीर हे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा न्यायालयाच्या आवारात नोटरी करून देण्याचे काम करतात. त्यांच्यासारख्या अनेक वकिलांची उपजीविका नोटरी करून देण्यावर आहे. या सर्वांची स्थिती सध्या सारखीच आहे. कोरोनामुळे अर्थ व्यवस्थेवर झालेला परिमाण, सरकारी कार्यालयांतील मंदावलेली कामे आणि पूर्ण क्षमतेने न्यायालयीन कामकाज होत नसल्याने नोटरी करून घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पूर्ण वेळ नोटरीची सेवा पुरविणाऱ्या अनेक वकिलांना सध्या घरखर्च कसा भागवायचा असा प्रश्‍न पडला आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून नोटरी म्हणून नियुक्त झालेले जिल्ह्यात दोन हजार वकील आहेत. त्यातील 400 वकिलांची गेल्या वर्षी नियुक्ती झाली आहे.

नोटरीसाठी न्यायालयात नो एन्ट्री :
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयात गर्दी होऊ नये म्हणून सुनावणीची तारीख नसलेल्या पक्षकारांना न्यायालयात सोडले जात नाही. त्यामुळे नोटरीसाठी आलेल्या पक्षकारांना न्यायालयात येता येत नसल्याने नोटरी करून देणारे वकील न्यायालयाच्या बाहेर बसत आहेत. नोटरीची काम न्यायालयाच्या आत करू नयेत, अशा सूचना देखील त्यांना देण्यात आल्या आहेत.

यामुळे नोटरीचे प्रमाण कमी :
- सरकारी कार्यालयात मंदावलेली कामे
- जिल्हा न्यायालय पूर्ण क्षमतेने सुरू नाही
- नोटरीवर भाडेकरार करण्याचे प्रमाण घटले
- नोटरीवाचून अडलेली कामे कोरोनामुळे ढकलली जात आहेत.

न्यायालयीन कामकाज नियमित सुरू झाले की नोटरी करून घेण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यातून अनेक वकिलांच्या उत्पन्नाचा प्रश्‍न सुटेल. दुपारनंतर न्यायालयात स्टॅम्प मिळत नसल्यानेही कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे ही परिस्थिती लवकर सुधारली पाहिजे. वकिलांनी एजंटामार्फत काम करून घेण्याचे थांबवले तर त्यांच्या फायदा होईल.
- ऍड. यशवंत खराडे, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com