
पुणे जिल्ह्यातील स्थिती : नोव्हेंबरमध्ये पुन्हा संख्या घटली
पुणे : जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये सुमारे पाच पटीने कमी झाली आहे. कोरोनाच्याबाबतीत पुणेकरांना दिलासा देणारी आकडेवारी पुढे आली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यावरील कोरोनाचे सावट विरळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे जिल्ह्यात एकट्या सप्टेंबर महिन्यात १ लाख १३ हजार ७०७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. नोव्हेंबर महिन्यात मात्र १९ हजार ३२४ इतकेच नवे रुग्ण आढळून आले आहेत. आॅक्टोबर महिन्यात १९ हजार ७१४ नवे रुग्ण सापडले होते. आॅक्टोबर महिन्यातील रुग्णसंख्येच्या प्रमाणात नोव्हेंबरमधील रुग्ण संख्या ३९० ने कमी झाली आहे.
पुणे शहरात ९ मार्च २०२० ला राज्यातील पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. अगदी मार्च संपेपर्यंत एकूण रुग्णांचे प्रमाण अवघे ५० होते. हीच संख्या आता ३ लाख ४२ हजार ९०१ वर गेली आहे.
... तरीही खबरदारी आवश्यक!
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी धोका टळलेला नाही. त्यातच दुसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. यामुळे मास्कचा नियमित वापर करणे, सातत्याने साबनाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सोशल डिस्टन्स पाळणे आणि लक्षणे दिसतात त्वरीत सरकारी रुग्णालयात जाऊन चाचणी करणे आवश्यक आहे.
पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी
आतापर्यंतची महिनानिहाय एकूण रुग्णसंख्या
(महिनाअखेरीस असलेली एकूण रुग्णसंख्या)
- मार्च --- ५०.
- एप्रिल --- १७००.
- मे ---- ७ हजार ७५०.
- जून ---- २२ हजार ४२९.
- जूलै ---- ८४ हजार ७६५.
- आॅगस्ट --- १ लाख ७० हजार ३१४.
- सप्टेंबर ---- २ लाख ८४ हजार २१.
- आॅक्टोबर ---- ३ लाख २३ हजार ५७७.
- नोव्हेंबर ---- ३ लाख ४२ हजार ९०१.
महिनानिहाय नवीन रूग्णांत वाढ
- मार्च --- ५०.
- एप्रिल --- १६५०.
- मे ---- ६ हजार ५०.
- जून ---- १४ हजार ६७९.
- जूलै ---- ६२ हजार ३३६.
- आॅगस्ट --- ८५ हजार ५७९.
- सप्टेंबर ---- १ लाख १३ हजार ७०७.
- आॅक्टोबर ---- १९ हजार ७१४.
- नोव्हेंबर ---- १९ हजार ३२४.
कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. तरीही प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्या वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आहेत. -डॉ. भगवान पवार,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पुणे.
(संपादन : सागर डी. शेलार)