Corona Updates : फक्त सोमवारीच कोरोना रुग्णांची संख्या होतेय कमी; काय आहे कारण?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

गेल्या २४ तासांत ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील सर्वाधिक ३१ जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील १३ आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता तीन लाखांच्या जवळ पोचली आहे. जिल्ह्यात सोमवारी (ता.५) केवळ १ हजार २४० नवे रुग्ण सापडले आहेत. यानुसार सलग पाचव्या सोमवारी नव्या रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते आहे.

रविवार हा सुट्टीचा दिवस आहे. परिणामी रविवारी अन्य दिवसांच्या तुलनेत कमी कर्मचारी कामावर असतात. त्यामुळे रविवारी खूपच कमी रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात येत असतात. रविवारी घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल सोमवारी प्राप्त होतो. म्हणूनच फक्त सोमवारच्या अहवालातच रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते, असे आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

बियर बारबाबत नवी नियमावली जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश​

सोमवारी सलग पाचव्या दिवशी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या १९ हजार ८६५ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. रविवारी (ता.४) हाच आकडा २० हजार ५१२ एवढा होता. याशिवाय १५ हजार ६२  जण घरातच उपचार घेत आहेत.

दरम्यान, सोमवारी दिवसभरात २ हजार ८०४ कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ९१७ जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ८३३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८१०, नगरपालिका क्षेत्रातील २२९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील १५ रुग्ण आहेत.

एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील केवळ ३९१ जण आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ४४३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २८७, नगरपालिका क्षेत्रात ७५ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रात ४४ नवे रुग्ण सापडले आहेत.

MPSC परीक्षा स्थगित करा अन्यथा...; मराठा क्रांती मोर्चानं काय दिलाय इशारा?

गेल्या २४ तासांत ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील सर्वाधिक ३१ जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील १३ आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही रविवारी (ता.४) रात्री ९ वाजल्यापासून सोमवारी (ता.५) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

सोमवारअखेरपर्यंत जिल्ह्यात ६ हजार ८६७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक ३ हजार ८२७, पिंपरी-चिंचवडमधील १
हजार ३७४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ९५, नगरपालिका क्षेत्रातील ३९३ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील १७८ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील २९७ जण आहेत.

संस्थानिहाय आजच्या टेस्ट आणि रुग्णांची संख्या :

संस्थेचे नाव एकूण टेस्ट नवे रुग्ण
पुणे महापालिका १ हजार ८३९ ३९१
पिंपरी-चिंचवड पालिका ३ हजार ४६१ ४४३
जिल्हा परिषद ८६१ २८७
नगरपालिका (१४) २०३ ७५
कॅंटोन्मेंट बोर्ड (३) १२४ ४४

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona patients in Pune district reached close to three lakh