महिला वनाधिकाऱ्याला धक्काबुक्की; बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांची मुजोरी

डी. के. वळसे पाटील
Wednesday, 30 December 2020

वनखात्याच्या महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की व सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून मंचर पोलिस ठाण्यात आदिक महिपत जाधव (रा. जाधववाडी, ता. आंबेगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

मंचर : नारायणगाव ते रांजणी रस्त्यावर जाधववाडी (ता. आंबेगाव) येथे गिरिजा हॉटेल जवळ मंगळवारी (ता. 29) विनापरवाना वृक्षतोड करून कडूलिंबाच्या लाकडांची टेम्पोतून वाहतूक केली. वनखात्याच्या महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की व सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून मंचर पोलिस ठाण्यात आदिक महिपत जाधव (रा. जाधववाडी, ता. आंबेगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी  नारायणगाव विभाग जुन्नर वनपरिक्षेत्रातील वन परिमंडळ अधिकारी मनीषा जितेंद्र काळे (रा. नारायणगाव ता. जुन्नर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 
वृक्षतोड करून जाधव टेम्पो (एम.एच 14 एच यु 4304) मधून लाकडे घेऊन जात होते. काळे यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली. त्याच्याकडे वृक्षतोडीचा व वृक्षवाहतुकीचा परवाना नव्हता.

जाधव यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन “तुम्ही मला विचारणारे कोण?”असे म्हणून शिवीगाळी केली. काळे यांच्या अंगावर धावून त्यांना धक्काबुक्की करून ढकलून दिले. यावेळी वनरक्षक रामेश्वर कोंडीबा फुलवाडी हे मोबाईलद्वारे टेम्पोचा व लाकडांचा फोटो काढत असताना जाधवने मोबाईल जबरीने हिसकावून घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. लाकडांसह टेम्पोही घेऊन जाधव पळून गेला, असे काळे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिस नाईक अजित  मडके पुढील तपास करत आहेत. आरोपी जाधव टेम्पोसह फरार झाला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत, असे मडके यांनी सांगितले. 

कोरेगाव भीमा येथे नागरिकांची होणार आरोग्य तपासणी 

कालबाह्य व जुने झालेल्या वृक्षांची तोड करावयाची असल्यास संबंधितानी वनखात्याची रीतसर परवानगी घ्यावी. विनापरवाना वृक्षतोड व वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कादेशीर कारवाई केली जाईल. बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांचे पथक कार्यान्वित केले आहे. दिवसा व रात्री पथक गस्त घालणार आहे. -अजित शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर व मंचर

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: obstruction of government work of a female officer by a person who cut down a tree