esakal | ऑफलाइन शाळांचा निर्णय पालकांची संमतिपत्रे ठरवणार I Offline School
sakal

बोलून बातमी शोधा

schools

ऑफलाइन शाळांचा निर्णय पालकांची संमतिपत्रे ठरवणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना संसर्ग आटोक्यात आला असला तरी, पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार आहेत की नाहीत, याची चाचपणी शहरातील शाळांनी सुरु केली आहे. या चाचपणीसाठी शाळांनी पालकांकडून संमतिपत्रे मागविली आहेत. या संमतिपत्रांचा कौल पाहून, येत्या चार आक्टोबरला ऑफलाइन शाळा सुरु करायची की नाही, याबाबतचा निर्णय संबंधित शाळा पातळीवर घेतला जाणार आहे. ग्रामीण भागातील शाळांनी मात्र सरकारच्या आदेशानुसार पुरेशी खबरदारी घेत, शाळा सुरु करण्याची तयारी केली आहे.

यानुसार शालेय परिसर स्वच्छता करणे, शाळा आणि वर्ग सॅनिटाईझ करणे, वर्गामध्ये पुरेसे अंतर ठेवणारी बैठक व्यवस्था करणे, पालकांना मार्गदर्शक सूचना देणे आदी कामे सुरु करण्याचा आदेश शहर व जिल्ह्यातील सर्व शाळांना देण्यात आल्याचे जिल्हा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यातील शाळा येत्या ४ आक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे सहा महिन्याच्या खंडानंतर पुन्हा शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानुसार शहरातील इयत्ता आठवीपासून बारावीपर्यंतचे आणि ग्रामीण भागातील पाचवीपासून बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत.

हेही वाचा: पुणे : ललित कला केंद्रात आता पाच वर्षाचा अभ्यासक्रम

पुणे शहरात ९ मार्च २०२० ला राज्यातील पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर राज्य सरकारने १६ मार्च २०२० पासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने २४ मार्च २०२० पासून केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु झाली. तेव्हापासून जानेवारी २०२१ पर्यंत सुमारे वर्षभर शाळा बंद होत्या. त्यानंतर जानेवारी २०२१ पासून माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या होत्या परंतु मार्च २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने, पुन्हा ऑफलाइन शाळा बंद झाल्या होत्या.

शहरात सातवी, ग्रामीणमध्ये चौथीपर्यंतचे वर्ग बंदच

शहरातील इयत्ता सातवीपर्यंतचे तर, ग्रामीण भागातील इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग यापुढेही बंदच राहणार आहेत. हे सर्व वर्ग मागील सुमारे दीड वर्षापासून बंद आहेत. कोरोनाची पहिली लाट कमी झाल्यानंतर आणि दुसरी लाट सुरू होण्यापूर्वी केवळ आठवीपासूनचे वर्ग सुरु करण्यात आले होते. शिवाय ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग सुमारे दीड वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा सुरु होत आहेत.

शाळांची पूर्वतयारी

- शाळांचा परिसर व वर्गाची स्वच्छता करणे

- वर्ग सॅनिटाईझ करून घेणे

- पालकांकडून संमतिपत्रे भरून घेणे

- वर्गात पुरेसे अंतर राखत बैठक व्यवस्था करणे

- प्रवेशद्वारावर सॅनिटायझर उपलब्ध करून देणे

- विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सिजन तपासण्याची सुविधा उपलब्ध करणे

- पालकांना मार्गदर्शक सूचना करणे

- ग्रामीण भागात पालक सभांचे आयोजन करण्यास सुरवात

- ग्रामीणमध्ये ग्रामपंचायतींकडून शाळेची स्वच्छता करून घेणे

- आजारी विद्यार्थ्याला घरीच थांबण्याची सूचना देणे

हेही वाचा: नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींविरोधात १३ पुरावे न्यायालयात सादर

विद्यार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी

- शाळेत पुरेसे अंतर राखणे

- स्वच्छ मास्कचा वापर करणे

- मास्कला सातत्याने हात न लावणे

- सातत्याने हात धुणे

- शाळेत येताना, सोबत सॅनिटायझरची बाटली सोबत ठेवणे

ग्रामीण भागातील पाचवीपासूनच्या सर्व शाळा सुरु केल्या जाणार आहेत. यामुळे ऑफलाइन भरणाऱ्या ग्रामीण भागातील शाळांची संख्या ही शहराच्या तुलनेत अधिक असणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा मागील सुमारे दीड वर्षांपासून बंद होत्या. त्यामुळे शाळा आणि शाळांची परिसर स्वच्छता करण्याचा आदेश ग्रामपंचायतींना दिला आहे.

- रणजित शिवतरे, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद.

loading image
go to top