दीड टन कांद्यावर चोरट्यांनी मारला डल्ला 

रवींद्र पाटे
Friday, 25 September 2020

हिवरेतर्फे नारायणगाव व खोडद (ता. जुन्नर) येथील दोन शेतकऱ्यांच्या कांदा चाळीतील सुमारे ६७ हजार रुपये किमतीच्या दीड टन कांद्यावर चोरट्यांनी डल्ला मारला.

नारायणगाव (पुणे) : हिवरेतर्फे नारायणगाव व खोडद (ता. जुन्नर) येथील दोन शेतकऱ्यांच्या कांदा चाळीतील सुमारे ६७ हजार रुपये किमतीच्या दीड टन कांद्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. मागील सहा महिने चाळीत कांदा साठवणूक करण्यासाठी घेतलेले परीश्रम वाया गेले. त्यामुळे या शेतकरी कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. याबाबत नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

काळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल !

हिवरेतर्फे नारायणगाव येथील बबन भोर यांची सातपुडा शिवारात शेती आहे. त्यांनी एप्रिल महिन्यात उत्पादित केलेला कांदा बाजारभाव नसल्याने चाळीत साठवून ठेवला होता. तो सुस्थितीत राहावा, यासाठी त्यांनी मागील सहा महिने काळजी घेतली होती. भाव वाढ झाल्याने गुरुवारी (ता. २४) जुन्नर येथील बाजार समितीत कांदा विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भोर कुटुंबीयांनी बुधवारी (ता. २३) चाळीतील कांद्याची निवड करून २७ गोणी भरून ठेवल्या. त्यापैकी १८ गोणी कांदा चांगल्या प्रतीचा व ९ गोणी कांदा दुय्यम प्रतीचा होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चोरट्यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास चांगल्या प्रतीच्या अठरा गोणी (१ हजार ८० किलो) कांदा चोरून नेला. चांगल्या प्रतीच्या कांद्याला सध्या प्रतिकिलो चाळीस ते पंचेचाळीस रुपये भाव मिळत आहे. कांदा चोरीला गेल्याने भोर यांचे सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, सप्टेंबर रोजी खोडद येथील शेतकरी शिवाजी खरमाळे यांच्या कांदा चाळीतून चोरट्यांनी सुमारे २२ हजार रुपये किमतीचा नऊ गोणी (५४० किलो) कांदा चोरून नेला होता. लागोपाठ कांदा चोरीच्या दोन घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

बिबट्यामुळे राखण करण्यात धोका 
या भागात बिबट्याची संख्या वाढली आहे. बिबट्याचे पाळीव प्राणी व मानवावर हल्ले झाले आहेत. तसेच, सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. या भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून कांदा चाळीचे राखण करणे अशक्य आहे, अशी माहिती बबन भोर यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half tons of onions were stolen by thieves