'तेलही गेले अन् तूपही गेले'; दीड लाखाच्या 'आयफोन' पायी गमावले सव्वा सात लाख!

iPhone
iPhone

पुणे : तरुणाला तब्बल दीड लाख रुपयांचा आयफोन 'लकी ड्रॉ'मध्ये लागल्याचे अनोळखी व्यक्ती फोनवरुन सांगतो. त्यानंतर तरुणाला तो आयफोन घेण्यासाठी 20 हजार रुपयांचे शुल्क भरण्यास सांगितले जाते. त्यापुढे वेगवेगळी कारणे सांगत तरुणाकडून पैसे उकळले जातात. शेवटी दीड लाखांच्या आयफोनसाठी त्याने स्वतःजवळील तब्बल सव्वा सात लाख रुपये गमावले. त्यानंतर कोणीतरी आपल्याला फसवल्याचे लक्षात येते आणि तो तरुण थेट पोलिस ठाण्याची पायरी चढतो. 

हडपसरमधील काळेपडळ येथे राहणाऱ्या 23 वर्षांच्या शुभम भापकर याने फसवणूक झाल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 20 जुलैपासून आत्तापर्यंत हा प्रकार घडला आहे. शुभमला 20 जुलै रोजी एका अनोळखी मोबाईलधारकाने फोन केला. आपण आयएसओ प्रमाणित मुहम्मद गॅझेट लिमीटेड या कंपनीचे मालक असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने त्याच्या कंपनीचे प्रमाणपत्र, ओळखपत्र शुभमच्या व्हॉटस्‌अपवर पाठविले. फिर्यादीचा विश्‍वास संपादन केल्यानंतर त्याने त्यास दीड लाख रुपये किंमतीचा 'आयफोन 11 प्रो मॅक्‍स' हा लकी ड्रॉमध्ये लागल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादीने त्याच्यावर विश्‍वास ठेवला.

प्रारंभी त्याने फिर्यादीकडून 20 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर मुंबई आणि दिल्ली विमानतळावर सीमाशुल्क विभागाकडे मोबाईल अडकला असल्याचे सांगत फिर्यादीकडून पुन्हा पैसे उकळण्यास सुरूवात केली. फिर्यादीकडून आरोपींनी वेळोवेळी तब्बल सव्वा सात लाख रुपये उकळले. त्यानंतरही त्यांना मोबाईल मिळाला नाही. फिर्यादीने त्यांच्याकडे विचारणा केली, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन नंतर प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने थेट पोलिस ठाणे गाठले. 

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी :-
- अनोळखी व्यक्तींना, फोनला प्रतिसाद देऊ नका. 
- ऑनलाईन व्यवहार करताना कुटुंबीयांना कल्पना द्या. 
- संपूर्ण माहिती असल्याशिवायक ई-बॅंकींग, ई-वॉलेटचा वापर करु नका. 
- कोणालाही ओटीपी क्रमांक देऊ नका. 
- अनोळखी ईमेल, लिंकला प्रतिसाद देण्याचे टाळा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com