पुणे : टोळक्‍याच्या मारहाणीत एकाचा मृत्यू; पाच अल्पवयीन ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

एकाने लोखंडी साखळीने सागरवर वार केले, तर काहींनी फ्लेक्‍सच्या लाकडी पट्‌टीने डोक्‍यात बेदम मारहाण केली.

पुणे : दुचाकीवरून जाणारा मित्र असल्याचा समज होऊन तरुणाने त्याला हाक मारली. मात्र, याचा राग येऊन सात जणांच्या टोळक्‍याने त्याला लोखंडी साखळी आणि लाकडी पट्टीसह लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. ही घटना मंगळवारी (ता.21) रात्री साडेबाराच्या सुमारास विश्रांतवाडी येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सागर महादेव भालेराव (वय 24, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रीतम राजकुमार जगदाळे (वय 19) व साहिल प्रकाश माने (वय 19, दोघे रा. मुंजाबावस्ती, धानोरी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत. याप्रकरणी शुभम भालेराव याने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

- 'क्रेडीट सिस्टीम'च्या त्रुटींमुळे रखडले निकाल

सागर आणि त्याचे दोन मित्र रात्री गोकुळनगर येथे चायनीज पदार्थ खाण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना सागरला त्याचा मित्र दुचाकीवरून जात असल्याचे वाटल्याने त्याने त्याला हाक मारली. त्याचा राग आल्याने हल्लेखोरांनी त्यांच्याकडे येऊन 'तू हाक का मारली', असा जाब विचारत वादावादी सुरू केली.

त्यानंतर मुंजाबा वस्ती गणपती चौकात आल्यावर या टोळक्‍याने सागरच्या मित्रांना धमकावून हाकलून देऊन सागरला मारहाण केली. एकाने लोखंडी साखळीने सागरवर वार केले, तर काहींनी फ्लेक्‍सच्या लाकडी पट्‌टीने डोक्‍यात बेदम मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी होऊन सागर रस्त्यावर पडला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. 

- पुणे : 'या' सरकारी कार्यालयात वेळेत हजर न राहिल्यास होणार कारवाई

सागरच्या घरच्यांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला त्वरित ससून रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले. त्यातील पाच जण अल्पवयीन असल्याचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed in gang beating in Pune five minor in custody