पुणे : 'या' सरकारी कार्यालयात वेळेत हजर न राहिल्यास होणार कारवाई

वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

  • विभागीय आयुक्‍तांनी उगारला शिस्तीचा बडगा 
  • कार्यालयात वेळेत हजर न राहिल्यास होणार कारवाई 

पुणे : कार्यालयात सकाळी वेळेत हजर न राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शिस्तीचा बडगा उगारला आहे. बुधवारी सकाळी चक्‍क स्वत: डॉ. म्हैसेकर यांनी विविध विभागाच्या कार्यालयात कोण अधिकारी-कर्मचारी वेळेत हजर आहेत, याची माहिती घेतली. त्यामुळे बेशिस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. विभागीय आयुक्‍त कार्यालयात पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून नागरिक कामानिमित्त येत असतात. त्यात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अधिकारी आणि कर्मचारी नसल्यास बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना त्रास होतो. काही अधिकारी-कर्मचारी वेळेत हजर राहत नसल्याची तक्रार त्यांच्याकडे आली. त्यामुळे त्यांनी सकाळी दहा वाजल्यापासूनच सर्व विभागात जाऊन पाहणी केली. त्यावेळी काही अधिकारी आणि कर्मचारी कामावर उशिरा आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेळेत हजर राहण्याचे निर्देश दिले. यापुढे वेळेत हजर न राहिल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला. 

सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी

नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आणि शासन स्तरावरील कामात लोकाभिमुखता आणि पारदर्शकता आणण्यासाठी विभागीय आयुक्‍तालयात 20 जानेवारीपासून मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची सुरवात करण्यात आली. तीन दिवसांत 50 प्रकरणे दाखल झाली आहेत. या कक्षात संगणक आणि वाय फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रलंबित प्रकरणे गतीने मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divisional Commissioner Dr. Deepak Mhashekar has created a discipline