औरंगाबादहून 'ती' आली महाळुंग्यात अन्...

बाबा तारे
मंगळवार, 30 जून 2020

गेल्या तीन महिन्यात योग्य ती खबरदारी घेऊनही महाळुंगे (पाडाळे) येथे अखेर आज एक महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्याने ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

औंध (पुणे) : गेल्या तीन महिन्यात योग्य ती खबरदारी घेऊनही महाळुंगे (पाडाळे) येथे अखेर आज एक महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्याने ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पुणे शहरात गेल्या तीन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच मनपा हद्दीशेजारील महाळुंगे (पाडाळे) येथे मात्र एकही रुग्ण सापडला नव्हता. या कालावधीत ग्रामपंचायतीच्या वतीने सरकारी नियमांचे पालन करण्यासह नागरीकांचे प्रबोधन केले जात होते. संबंधित सत्तावीस वर्षीय गरोदर महिला ही औरंगाबाद येथून प्रवास करुन महाळुंगे येथे आली होती. तपासणीअंती ती कोरोनाबाधित आढळून आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

ती महिला गरोदर असल्याने दिनानाथ रुग्णालयात तिची  नियमित तपासणी केली जात असे. परंतु, औरंगाबादहून प्रवास करुन आल्यानंतर ही महिला पुन्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. तिथे गेल्यानंतर तिला कोरोना सदृश खोकला असल्याने डॉक्टरांनी तिची कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. चाचणीनंतर संबंधित महिला ही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर मुळशी तालुका आरोग्य विभागाला ही माहिती कळवण्यात आली. यानंतर या महिलेच्या पतीचीही चाचणी करण्यात आली होती. परंतु, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. संबंधित पती पत्नी कुणाच्याही संपर्कात आलेले नाहीत त्यामुळे महाळुंगे ग्रामस्थांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे ग्रामविकास अधिकारी सोमनाथ नवले यांनी सांगितले. तसेच आरोग्य विभागाकडून येणाऱ्या सूचना व निर्देशानुसार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जातील असेही नवले यांनी सांगितले.

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

सध्या संबंधित इमारतीत निर्जंतुकीकरण करण्यात आले असून आवश्यक तेथे निर्जंतुकीकरण केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच महाळुंगे ग्रामपंचायत हद्दीत मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी खबरदारी घेत सुरक्षित अंतर ठेवण्यासह सॅनिटाइजर, मास्कचा  वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one person affected by corona