शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, कांद्याचे भाव आठ रुपयांनी घसरले 

onion
onion

मंचर (पुुणे) : मंचर कृषी बाजार समितीच्या आवारात गुरुवारी (ता. १७) सहा हजार कांदा पिशव्यांची आवक झाली. मात्र, कांदा निर्यातबंदीमुळे प्रती किलोला पाच ते आठ रुपयांनी बाजारभाव घसरले आहेत. कांद्याला सरासरी २५ ते २७ रुपये प्रती किलो बाजारभाव मिळाला. सोमवारी (ता. १४) ते प्रतिकिलो ३० ते ३५ रुपयांपर्यंत गेले होते. 

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंचर व लोणी येथे दर आठवड्याला एकूण सहा वेळा कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार लिलाव पद्धतीने शेतकऱ्यांसमोर केले जातात. महिन्याला सरासरी दोन लाख कांदा पिशव्यांची आवक होते. वर्षाला सरासरी ३० लाख कांदा पिशव्यांची आवक होते. याव्यतिरिक्त शेताच्या बांधावर व्यापारी कांद्याची खरेदी करतात. तसेच, थेट पुणे व मुंबईच्या बाजारपेठेतही कांदा विक्रीस पाठवतात. मंचर बाजारात आज कांद्यचे बाजारभाव प्रतिकिलोला पाच ते आठ रुपयांनी घसरले आहेत. सरासरी २५ ते २७ रुपये प्रती किलो बाजारभाव मिळाला. सोमवारी (ता. १४) कांद्याचे बाजारभाव प्रतिकिलो ३० ते ३५ रुपयांपर्यंत गेले होते. 

याबाबत आंबेगाव तालुका बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी सांगितले की, दक्षिण भारतात झालेल्या पावसामुळे शेतातच कांदा पीक खराब झाले. तर, महाराष्ट्रात हवामानामुळे साठविलेला कांदा ३० टक्के खराब झाला. त्यातून आवकच घटली आहे. कांद्याला देशांतर्गत मागणी वाढली आहे.कांदा निर्यातीमुळे बाजारभावाची घसरण सुरु झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. कांदा निर्यातबंदीचा परिणाम मंगळवारपासून (ता. १५) सुरु झाला आहे. कांद्याच्या बाजारभावात होणारी घट शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटणारी आहे. 

कांदा पिकाचे आर्थिक गणित 
कांदा रोपे तयार होण्यासाठी पावणेदोन महिने लागतात. लागवड केल्यानंतर चार महिन्यानंतर कांदा पीक काढता येते. साठवण, वाहतूक, मजुरी, बियाणे, खते, औषधे असा एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. प्रतिकिलोला कांद्याचा किमान २० रुपये हमीभाव दिल्यास कांदा शेत फायद्याची ठरेल. 

एक महिन्यापूर्वी सात ते आठ रुपये कवडीमोल किमतीने कांदा शेतकऱ्यांना विकावा लागला. त्यावेळी शेतकऱ्यांचे दुःख केंद्र सरकारला दिसले नाही. आता मात्र खाणाऱ्याला थोडी झळ बसायला लागली, तर सरकार खडबडून जागे झाले. वास्तविक पाहता सरकारने कांदा निर्यातबंदी करायला नको होती. 
- देवदत्त निकम, सभापती, आंबेगाव तालुका बाजार समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com