विद्यार्थ्यांच्या वजनाच्या केवळ १० टक्के हवे दप्तराचे ओझे

School-Bag-Weight
School-Bag-Weight

पुणे - सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्यक्षात शाळा सुरू नसल्या तरी आता इयत्ता सातवीला असणारा सोहम मागील शैक्षणिक वर्षापर्यंत तब्बल पाच ते सहा किलो वजनाचे दप्तर घेऊन शाळेत जात होता, असे आई अनुराधा आव्हाड यांनी सांगितले. पण आता शाळा पूर्ववत सुरू झाल्यानंतर मात्र सोहमच्या पाठीवरील दप्तराचे ओझे उतरणार असून तो केवळ आपल्या वजनाच्या केवळ १० टक्के वजनाचेच दप्तर घेऊन शाळेत जाऊ शकणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

होय, सोहमप्रमाणेच देशातील इयत्ता पहिली ते बारावीच्या कोटयावधी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे उतरविण्यासाठी आता थेट केंद्र सरकारनेच 'स्कूल बॅग धोरण २०२०' आणले आहे. विद्यार्थ्याचे वजनाच्या केवळ १० टक्के दप्तराचे वजन असावे आणि त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी, अशा स्पष्ट सूचना केंद्र सरकाने दिल्या आहेत. त्याशिवाय नवीन शैक्षणिक धोरणात उल्लेख केल्याप्रमाणे तब्बल दहा दिवस दप्तराविना शाळेचा आनंदही विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या दिवसात शाळेत विविध प्रशिक्षण, कृतीशील उपक्रम राबविले जावेत, असे धोरणात म्हटले आहे.

शाळेत इयत्तेनुसार विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन किती असावे, दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळा, व्यवस्थापन आणि प्रशासनाने काय करावे, याबाबतच्या मार्गदर्शक करणारे 'स्कूल बॅग धोरण २०२०' कार्यन्वित केले आहे. देशातील कोटयावधी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हे धोरण आहे. धोरणाच्या अनुषंगाने अहवाल आणि मसूदा तयार करण्यासाठी सरकारने २०१८मध्ये अभ्यासकांची समिती नेमली होती.

राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर हे देखील या सहा जणांच्या समितीत सदस्य म्हणून कार्यरत होते. समितीने 'स्कूल बॅग'बाबत केलेल्या अहवालाला केंद्र सरकारने मान्यता दिली असून देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात या धोरणाप्रमाणे कार्यवाही व्हावी, असे आदेश केंद्र सरकारच्या सचिव सुनीता शर्मा यांनी दिले असल्याचे टेमकर यांनी सांगतिले.

इयत्ता पहिली आणि दुसरीकरिता एक वही आणि तिसरी ते पाचवीसाठी एक वर्गातील आणि एक गृहपाठ अशा दोन वह्या, तर सहावी ते आठवीकरिता फाइल सूटे कागद नोट्स काढण्यासाठी वापरण्यात याव्यात, असे स्कूल बॅग धोरणात नमूद केले आहे.

धोरणाचा मसूदा तयार करताना समिती सदस्यांनी देशभर शाळेच्या दप्तराचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात प्रातिनिधिक स्वरूपात ३५२ शाळा, २,९९२ पालक आणि ३,६२४ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये १९ टक्के प्राथमिक शाळांच्या (पहिली ते पाचवी) प्रमुखांना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे तुलनेने अधिक असल्याचे दिसून आले.

इयत्तेनुसार विद्यार्थ्यांचे सरासरी वजन आणि त्यानुसार दप्तराचे अपेक्षित वजन -
इयत्ता : विद्यार्थ्यांचे सरासरी वजन (किलोमध्ये) : दप्तराचे अपेक्षित वजन

  • पूर्व प्राथमिक : १०-१६ : दप्तराविना शाळा
  • पहिली, दूसरी : १६-२२ : १.६-२.२
  • तिसरी ते पाचवी : १७- २५ : १.७-२.५
  • सहावी, सातवी : २०-३० : २-३
  • आठवी : २५-४० : २.५-४
  • नववी, दहावी : २५-४५ : २.५-४.५
  • अकरावी, बारावी : ३५-५० : ३.५-५

स्कूल बॅग धोरण २०२० नुसार अशी व्हावी कार्यवाही
- शिक्षकांनी नियमितपणे विद्यार्थ्यांचे दप्तर तपासावे
- दप्तराचे ओझे वाटणार नाही, त्याप्रमाणे वेळापत्रक आखावे
- वर्गात पाठ्यपुस्तके शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- पिण्याच्या पाण्याची सोय करावी
- पाठ्यपुस्तकांची निर्मिती करतानाही वजन वाढणार नाही, याचा विचार व्हावा.

'विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारने यापुर्वीच पावले उचलली आहेत. त्यातील बहुतांश पर्याय हे केंद्र सरकारच्या 'स्कूल बॅग धोरण २०२०' यात समाविष्ट आहेत. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये  दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आता अधिक सक्षमपणे पावले उचलणे शक्य होणार आहे."
- दिनकर टेमकर, सहसंचालक, राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि सदस्य, स्कूल बॅग धोरण २०२०

पालकांच्या म्हणण्याप्रमाणे या कारणांमुळे वाढते दप्तराचे ओझे (कारणे क्रमवारीत) -
- पाठ्यपुस्तके 
- वह्या
- संदर्भ पुस्तके
- स्पोर्ट आणि अन्य साहित्य
- जेवणाचा डब्बा

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com