जुन्नर तालुक्यातील जेमतेम तीस शाळाच होणार सुरू : खोडदे

रविंद्र पाटे
Sunday, 22 November 2020

जुन्नर तालुक्यात आरटीपीसीआर चाचणीला विलंब : १०५ पैकी जेमतेम तीस शाळा सोमवारी सुरू होणार: गटशिक्षणाधिकारी खोडदे 

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील एक हजार पाचशे वीस पैकी चारशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आज अखेर आरटीपीसीआर चाचणी झाली आहे. त्या पैकी दोनशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे. या मुळे उद्या तालुक्यातील १०५ पैकी जेमतेम तीस शाळांतील इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांचे शैक्षणिक काम सुरू होईल. अशी माहीती गटशिक्षणाधिकारी के. बी. खोडदे यांनी दिली.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून व पालकांचे हमीपत्र घेऊन सोमवारपासून (ता. २३) नववी ते बारावीच्या वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.

Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

त्या दृष्टीने शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पालकांचे हमीपत्र (संमती पत्र) घेऊन येणे बंधनकारक करण्यात आले आहे.हमीपत्रात दिलेल्या मार्गदर्शक सूचनात पाल्यास कोरोना संसर्ग झाल्यास त्यास शाळा प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या मुळे आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्याबाबत पालकांमध्ये द्विधा अवस्था दिसून येत आहे.ग्रामीण, आदिवासी भागांतील काही शाळेत सोयी सुविधाचा अभाव आहे.

शाळा निर्जंतुकीकरण करण्याचा खर्च कसा करायचा असा प्रश्न मुख्याध्यापक व शिक्षक व्यक्त करत आहेत. या बाबत गटशिक्षणाधिकारी खोडदे म्हणाले स्थानिक ग्रामपंचायत ,सेवाभावी संस्था अथवा संस्थाचालक यांच्या माध्यमातून शाळा निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्यात नववी ते बारावीच्या वर्गातील सुमारे तीन हजार विद्यार्थी आहेत.पहिल्या टप्प्यात २३ नोव्हेंबर पर्यंत तालुक्यातील एक हजार पाचशे वीस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे नियोजन केले होते. मात्र ओझर येथील कोविड केंद्रात रोज १५० जणांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते.त्या नंतर दोन दिवसांनी कोरोना अहवाल प्राप्त होतो. या मुळे तालुक्यातील सर्व १०५ शाळांचे शैक्षणिक काम सोमवारपासून सुरू होणार नाही.

शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांच्या समवेत मुख्याध्यापकांची ऑनलाईन सहविचार सभा झाली. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची तपासणी होऊन अहवाल शाळेत येणे आवश्यक आहे. त्याशिवाय शाळा सुरू करू नयेत. तसेच पालकांचे संमती पत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश द्यावा, आशा सूचना डॉ. मोरे यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. 

जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

आरटीपीसीआर तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील चारशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यां पैकी आज अखेर दोनशे जणांचा कोरोना चाचणी अहवाल  प्राप्त झाला आहे.तपासणी अहवाल प्राप्त झालेले सर्व दोनशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोना निगेटिव्ह आहेत.तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने रोज दीडशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करणे शक्य होत आहे.-डॉ. वर्षा गुंजाळ, वैद्यकीय अधिकारी  

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 30 schools will be started in Junnar taluka says khodde