esakal | पुण्यात १८ ते ४४ वयोगट लसीकरणासाठी दोनच केंद्र

बोलून बातमी शोधा

Vaccination
पुण्यात १८ ते ४४ वयोगट लसीकरणासाठी दोनच केंद्र
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी १ मे (शनिवार) पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असला तरी लशीच्या तुटवड्यामुळे या निर्णयांची केवळ प्रातिनिधीक पद्धतीने अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी केवळ कमला नेहरू रुग्णालय व राजीव गांधी रुग्णालय या दोन ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. ४५ ते पुढील वयोगटाचे लसीकरण शनिवारी व रविवारी बंद असणार आहे.

१ मे पासून लसीकरण होणार असल्याने १८ वयाच्या पुढील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. लसीकरण सर्व केंद्रांवर होईल अशी अपेक्षा होती; पण लसीचा तुटवडा व त्यामुळे नियोजन होऊ न शकल्याने लसीकरणाबाबत संभ्रम होता. याबाबत रात्री उशिरा महापालिकेने भूमिका स्पष्ट केली. ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना या दोन रुग्णालयांचीच निवड केली असेल, अशांनाच लस देण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी केवळ ३५० जणांना लस देण्यात येणार आहे.

नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी त्यांनी निवडलेल्या स्लॉटनुसारच वरील दोन लसीकरण केंद्रावर उपस्थित राहावे, नोंदणी न केलेल्या नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

हेही वाचा: Pune Corona Update: दिलासादायक! 10 दिवसांत शहरातील रुग्णांची संख्या साडेआठ हजारांनी कमी

शनिवार, रविवारी लसीकरण बंद

राज्य शासनाकडून शुक्रवारी केवळ ५ हजार डोस पालिकेला मिळाले आहेत. हे डोस अपुरे असल्याने १ मे व २ मे रोजी ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण बंद असणार आहे. सोमवारी ३ मे रोजी शासनाकडून लस उपलब्ध झाल्यास ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी लसीकरण केंद्रे सुरु केले जातील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शुक्रवारी शहरात १२ हजार ८८४ जणांचे लसीकरण झाले आहे.

असे असेल लसीकरण

१ मे रोजी दोन केंद्रांवर प्रत्येकी ३५० लसीकरण होणार

ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांचे लसीकरण

राज्य शासनाकडून केवळ ५ हजार डोस उपलब्ध

हे डोस १८ ते ४४ वयोगटासाठी वापरले जाणार

हेही वाचा: देहविक्री करणाऱ्या महिलांचे अनुदान कष्टकरी महिलांच्या खात्यावर; चौकशीची मागणी

मागणी बारा हजारांची, मिळाले पाचच हजार!

पुणे - कोरोनाबाधित रुग्णांसाठी शुक्रवारी पाच हजारांहून अधिक रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील ४६२ खासगी कोविड रुग्णालयांना हा साठा वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खासगी कोविड रुग्णालयांची संख्या सहाशेच्या जवळपास पोचली आहे. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची संख्या सुमारे १६ हजार आहे. शुक्रवारी ४६२ खासगी रुग्णालयांकडून १२ हजार २७८ रुग्णांसाठी रेमडेसिव्हिरची मागणी करण्यात आली होती; परंतु त्यांना निम्म्यापेक्षाही कमी रेमडेसिव्हिर उपलब्ध झाले.

जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी ४६२ खासगी कोविड रुग्णालयांतील रुग्णांसाठी पाच हजार १९२ रेमडेसिव्हिर उपलब्ध करून दिले आहेत. खासगी कोविड रुग्णालयांतील ऑक्सिजन आणि आयसीयू बेडच्या संख्येनुसार प्रशासनाकडून रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

- विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी