केशरी कार्डधारकांचं धान्य दुकानांपर्यंत पोचलंच नाही; ३ महिन्यांपासून धान्याची प्रतीक्षा!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

केशरी कार्डधारकांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे धान्य मिळणे अपेक्षित होते. परंतु ऑक्‍टोबर महिना अर्धा उलटूनही जुलै महिन्याचे धान्य मिळालेले नाही. 

पुणे : दसरा-दीपावलीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, रेशन दुकानांमध्ये साखर आणि डाळी आलेल्या नाहीत. केशरी कार्डधारकांसाठी जुलै महिन्याचे धान्यही ऑक्‍टोबरपर्यंत रेशन दुकानापर्यंत पोचलेले नाही. अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठी नियमित गहू, तांदूळ वितरण सुरू आहे. परंतु या गरीब लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हरभरा डाळीचा दर्जा खराब असल्याची तक्रार रेशन दुकानदारांकडून करण्यात येत आहे. 

कोरोना कालावधीत केशरी कार्डधारकांसाठी केंद्र सरकारने गहू-तांदूळ अल्पदरात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार एप्रिल आणि मे महिन्यात गहू आठ रुपये प्रतिकिलो आणि तांदूळ 12 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर केशरी कार्डधारकांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे धान्य मिळणे अपेक्षित होते. परंतु ऑक्‍टोबर महिना अर्धा उलटूनही जुलै महिन्याचे धान्य मिळालेले नाही. 

शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस उतरणार रस्त्यावर; राज्यभरात उद्या ‘शेतकरी बचाव रॅली’!​

केशरी कार्डधारकांसाठी जुलै महिन्याचा गहू-तांदूळ येत्या 15 दिवसांत रेशन दुकानांमध्ये उपलब्ध होईल. दसरा-दीपावलीसाठी अद्याप धान्य किंवा डाळी आलेल्या नाहीत. सणांपूर्वी धान्य, डाळी आणि साखर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 
- अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर 

अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंबांसाठी देण्यात येणाऱ्या हरभरा डाळीचा दर्जा खूपच खराब आहे. हरभरा डाळ किडलेली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून तक्रारी वाढल्या आहेत. केशरी कार्डधारकांच्या धान्यासाठीही जुलै महिन्यापूर्वी पैसे भरले आहेत. परंतु जुलै महिन्याचे धान्य अजून मिळालेले नाही. 
- गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे शहर

पुणेकरांनो सावध राहा; डिसेंबर-जानेवारीत येणार कोरोनाची दुसरी लाट!​

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील स्थिती : 

रेशन दुकाने : 770 
अंत्योदय योजना शिधापत्रिका संख्या : 8 हजार 418 
लाभार्थी : 37 हजार 231 

अन्नसुरक्षा योजना शिधापत्रिका संख्या : 3 लाख 1 हजार 886 
लाभार्थी : 12 लाख 43 हजार 148 

केशरी शिधापत्रिका संख्या : 7 लाख 24 हजार 295
लाभार्थी : 30 लाख 27 हजार 167

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orange ration cardholders have not received grain from three months