
'Whatzo' स्टार्टअपच्या माध्यमातून वयोवृद्धांच्या अडचणी दूर
पुणे: कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली आणि शिवाजीनगर येथील शिंदे आजी आणि आजोबा मात्र पुण्यातच अडकले. या वृद्ध जोडप्याशिवाय घरात कोणीच नाही. त्यामुळे घराबाहेर पडून औषधे, भाजी-पाला आदी जीवनावश्यक वस्तू आणण्यात अडचणी येऊ लागल्या. ७० ओलांडलेल्या या आजी-आजोबांना स्मार्ट ॲप्स देखील वापरता येत नव्हते. त्यामुळे झालेली या जोडप्याची गैरसोय दूर केली ती ‘व्हॉटझो’ (Whatzo) या स्टार्टअपने. या स्टार्टअपच्या माध्यमातून ते आता घरबसल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी मागवत आहेत.
हेही वाचा: Pune-Nashik Railway: सेमी हायस्पीड रेल्वे ४ वर्षांत धावणार
शिवाजीनगरच्या गुरूकुल अपार्टमेंट येथील शांताराम आणि कमल शिंदे या दांपत्याची नात ऐश्वर्या कर्नावट पिंपरी चिंचवड येथे राहते. कडक लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे शक्य नसल्याने तिने आपल्या आजी-आजोबांना या स्टार्टअपबाबत कल्पना दिली. जी त्यांना हाताळणे देखील सोपी होती. त्यामुळे त्यांना आवश्यक त्या वस्तू ऐश्वर्या ही व्हॉट्झोच्या माध्यमातून पोचवत होती. पुण्यातील ३० वर्षीय निर्मय छाजेड यांनी सुरू केलेल्या ‘व्हॉटझो’ स्टार्टअपमुळे शिंदे आजी-आजोबांप्रमाणे इतरांनी देखील याचा फायदा होत आहे. छाजेड यांनी लॉकडाऊनच्या काळात लोकांची समस्या लक्षात घेता ऑक्टोबर २०२० मध्ये या स्टार्टअपची सुरवात केली. यामध्ये तांत्रिक बाबी अक्षय गुजर आणि मार्केटिंगचे काम पूर्वा दर्डा पाहतात. या स्टार्टअपमध्ये सध्या २८ जणांची टीम कार्यरत असून या सेवेचा लाभ केवळ पुणेकरांपर्यंत मर्यादित न राहता देशातील १४ शहरांमध्ये व्हॉटझोला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत व्हॉटझोच्या माध्यमातून ४० ते ४५ हजार ग्राहकांना सेवेचा लाभ झाला आहे.
हेही वाचा: Pune Corporation Election: हरकतींचा पाऊस पण सुनावणीला निरुत्साह
‘‘कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये डोअरस्टेप डिलिव्हरी सेवा अत्यावश्यक बनली आहे. अशात बऱ्याच जणांना अॅप डाऊनलोड करणे आणि वापरण्याच्या अवघड प्रक्रियेमुळे अनेक अडचणी येतात. त्यामुळे त्यांना सोप्या पद्धतीत आवश्यक वस्तूंची घरपोच सेवा मिळावी म्हणून ही कल्पना सुचली. व्हॉट्सअपवर ही सेवा असल्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना डिलिव्हरी सेवेचा लाभ घेण्यास मदत होत आहे.’’
निर्मय छाजेड, संस्थापक- व्हॉटझो स्टार्टअप
‘व्हॉट्झो’ बाबत
‘व्हॉटझो’च्या माध्यमातून हॉटेलमधून पार्सल, किराणा, औषधे, टिफिन अशा विविध ऑर्ड्सचे पिकअप अँड ड्रॉप
यासाठी कोणत्याही ॲपची गरज नाही
ग्राहकांना त्यांच्या व्हॉट्सॲपच्या वापरातून आवश्यक वस्तू घर पोच
यासाठी ८१८१८१५५४३ वर ‘हाय’ पाठवून सेवेचा लाभ
मेसेज पाठविल्यानंतर ऑटोमेटेड चॅटबॉट ग्राहकांना ऑर्डर देण्यासाठी मार्गदर्शन करेल
व्हॉट्सॲप लोकेशन शेअर फीचर वापरून किंवा पत्ता टाइप करून ग्राहक पीक अप किंवा ड्रॉप लोकेशन शेअर करू शकतात
ग्राहक कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) किंवा ऑटो-जनरेट पेमेंट लिंक वापरून पेमेंट करू शकतात
तसेच व्हॉट्सॲप विंडोच्या माध्यमातून डिलिव्हरी ट्रॅकिंग लिंक आणि इनव्हॉइस मिळवू शकतात
व्हॉटझोची सेवा या शहरांमध्ये
पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, कोलकता, सुरत, जयपूर, गोवा, इंदूर, भोपाळ, चंडीगड
Web Title: Overcoming Problems Elderly Through Whatzo Startup
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..