राज्यपालांच्या हस्ते पराग मते यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

award

राज्यपालांच्या हस्ते पराग मते यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान

खडकवासला : कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचा सामाजिक पर्यावरण मित्र पुरस्कार पराग श्रीपतराव मते यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात आला. त्यांनी ‘वुई पुणेकर्स’ संस्थेच्या माध्यामतून मुळा- मुठा नदी स्वच्छतेचे काम केले आहे.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टने पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सत्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई राजभवन येथे करण्यात आला. पराग मते यांनी ‘वी पुणेकर्स’च्या माध्यमातून २० हजार तरुण- तरुणींचे संघटन उभारले आहे. नदी स्वच्छतेची जनजागृती करीत मुळा- मुठा नदी स्वच्छता, जलशुद्धीकरण, पर्यावरण संतुलन, आरोग्य साक्षरता यात कार्य केले आहे. त्याची दखल घेऊन हा सत्कार केला आहे.

खडकवासला गावातील ग्रामदैवत भैरवनाथासह नऊ देवतांचे मंदिर उभारण्यात ग्रामस्थांच्या बरोबर पराग मते यांचा मोठा वाटा आहे. गावाला शिवकाळातील इतिहास आहे. म्हणून त्यांनी या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंगाची चित्र प्रदर्शित केली आहेत. शिवराज्याभिषेक दिनानिमिताने शिवनेरी ते रायगड अशी पालखी सोहळा असतो. त्यास त्यांनी पाठबळ दिले आहे. गावातील श्री भैरवनाथ विठ्ठल मंदिर देवस्थानचे ते अध्यक्ष आहेत.

पुरस्कार मिळाल्याबाबत मते म्हणाले, “पुढच्या पिढीचे आपण देणं लागतो. या न्यायाने काम करताना पर्यावरणाच रक्षण करणं हे आपले सर्वांचेच कर्तव्यच आहे. याची जाणीव माझ्या सर्व सहकार्यांना सदैव होती. त्यातून नदी स्वच्छतेचे काम करण्याची सुरवात झाली. माझी जन्मभूमी असलेल्या खडकवासला गावापासून ते मुळा- मुठा संगम येरवडापर्यंत केली. हे काम करताना लोकांचा सहभाग हळूहळू वाढत गेला. त्यामुळे या कामासाठी मला बळ मिळत गेले. म्हणूनच आजपर्यंत मला या नदी स्वच्छतेच्या कामात जवळपास १८ ते २० हजार तरुणांच्या बरोबर हे काम करण्याची संधी मिळाली आहे. हे मी माझे भाग्यच समजतो.”

“नदी स्वच्छतेच्या कामात माझ्या बरोबर जागृती संस्था, वुई पुणेकर, हेल्प रायडर्स, युथ फाउंडेशन, शैलजा देशपांडे, शामला देसाई या व्यक्ती व संस्था काम करतात. त्यामुळे हा सन्मान केवळ माझा नाही. या संस्था व त्यातील सक्रीय सहभाग व सिंहाचा वाटा असणाऱ्यांचा प्रत्येकाचा सत्कार आहे. मी नदी स्वच्छतेसाठी अखंड काम करणाऱ्या सर्वांसाठी हा सन्मान मी नम्रपणे समर्पित करतो.

- पराग मते, वुई पुणेकर

टॅग्स :Pune News