

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ११ ः- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि काँग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी परस्परांविरोधात निदर्शने केल्याने वातावरण तापले. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. त्याचवेळी ‘विरोधकच चर्चेपासून पळ काढत आहेत,’ असा आरोप करत ‘एनडीए’च्या खासदारांनी आंदोलन केले. दोन्ही बाजूंचे खासदार आमनेसामने आल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
गृहमंत्र्याच्या निवेदनाच्या मागणीवरून काँग्रेसचे खासदार संसदेत आक्रमक आहेत. तर सरकार चर्चेला तयार असताना विरोधकाकंडून गृहमंत्र्यांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप सत्ताधारी खासदार करत आहेत. विरोधी खासदारांनी संसदेच्या मकरद्वार या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली. त्याचवेळी ‘एनडीए’च्या मंगल मिलन बैठकीनंतर परत आलेल्या भाजप खासदारांनी मकरद्वाराजवळ येऊन घोषणाबाजी करत आपले आंदोलन सुरू केले. दोन्ही बाजूंचे खासदार एकाच ठिकाणी जमा होऊन घोषणायुद्ध रंगल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान संसदेत प्रवेश करत असताना काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी आणि भाजपचे खासदार मुकेश दलाल यांच्यातही शाब्दिक चकमक झाली. भाजप खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना दलाल यांनी, ‘राहुल गांधी झारखंडमधील विद्यार्थी आंदोलकांना भेटायला का जात नाहीत?’ असा सवाल केला. त्यावर प्रियांका गांधी हसत त्यांच्याजवळ गेल्या आणि ‘‘राहुल गेले आहेत आणि विद्यार्थी आंदोलकांची भेटही घेतली आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
सभागृहातही घोषणाबाजी
लोकसभेचे कामकाज सकाळी अकराला सुरू झाल्यानंतर सभागृहात विरोधकांनी अध्यक्षांच्या समोरील हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केल्याने सभागृहाचे कामकाज विस्कळित झाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार विरोधकांना कामकाज सुरळीत चालू देण्याचे आवाहन केले, त्याचप्रमाणे लोकसभेच्या कामकाज विषयक समितीच्या बैठकीत सरकारने गृहमंत्री उत्तर देण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे, असेही लोकसभाध्यक्षांनी सांगितले. मात्र गोंधळ कायम राहिल्याने अखेर लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर दुपारी सभागृह सुरू झाल्यानंतर गोंधळात विधेयके संमत करण्यात येऊन उद्यापर्यंत कामकाज थांबविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.