पुणे जिल्ह्यातील या व्यवसायांना प्रशासनाची परवानगी... 

जनार्दन दांडगे
बुधवार, 20 मे 2020

मागील साठ दिवसांपासून बंद असलेल्या ग्रामीण भागातील बाजारपेठा पुन्हा सुरू होणार आहेत.

une-news">पुणे) : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कटेंन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) वगळता सकाळी सात ते सायंकाळी सात यादरम्यान दुकानांसह सर्व प्रकारचे व्यवसाय बुधवारपासून (ता. 20) सुरू करण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मागील साठ दिवसांपासून बंद असलेल्या ग्रामीण भागातील बाजारपेठा पुन्हा सुरू होणार आहेत. या आदेशास हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दुजोरा दिला आहे.
 
लयभारी...शिवरीकरांच्या खड्या पहाऱ्याने कोरोना पळाला कोसो दूर... 

जिल्हाधिकारी कार्यालयाने ग्रामीण भागातील व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी भविष्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी दुकानदारांनी सोशल डिस्टन्ससह सरकारने घालून दिलेल्या विविध सूचनांचे पालन सक्तीने करण्याची अट मात्र कायम ठेवली आहे. तसेच, दुकानात येणारे ग्राहक व दुकानातील कामगार यांच्या सुरक्षेची जबाबदारी दुकान मालकांवर सोपवली आहे. सुरक्षिततेकडे काणाडोळा केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा इशाराही देण्यात आला आहे. 

दरम्यान, ग्रामीण भागातील सुवर्ण व्यवसाय, कापड दुकाने, हार्डवेअर, बांधकाम साहित्य पुरवणारी दुकाने, छोटे- मोठे उद्योगधंदे, अशा सर्वच प्रकारच्या व्यवसायांना चालू करण्यास परवानगी मिळालेली असली; तरी शाळा- कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्र, हॉटेल, लॉज, सलून या सारखे व्यवसाय बंद राहतील, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे मैदानात... 

पुणे शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढू लागल्याने दुग्ध व्यवसाय, किराणा, वैद्यकीय सेवा यासारख्या अत्यावश्‍यक गोष्टी वगळता सर्वच प्रकारचे व्यवसाय मागील साठ दिवसापासून बंद आहेत. मागील तीन दिवसापासून देशभरात चौथा लॉकडाउन सुरू झाला आहे. या पाश्वभुमिवर केंद्र सरकारने चौथ्या लॉकडाउनची नियमावली ठरवण्याचे अधिकार राज्यांना दिले होते. त्यानुसार राज्याच्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाने सुधारित नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार कटेंन्मेंट झोन वगळता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सकाळी सात ते सायंकाळी सात या दरम्यान दुकानांसह सर्व प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामीण भागात हे राहणार बंद 
- शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्‍लास, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा (घरपोच पार्सल सेवा देणाऱ्या हॉटेलला परवानगी), सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडिटोरियम, थिएटर. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना बंदी. सर्व धार्मिकस्थळे बंद राहणार. 

- दोनचाकी वाहनांवर फक्त एका व्यक्तीस प्रवासाची परवानगी, तर तीन चाकी व चार चाकी वाहनात चालक सोडून दोघांना प्रवासाची परवानगी. 
- जीवनावश्‍यक सेवा व अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कोणत्याही कारणासाठी रात्री सात ते सकाळी सात या दरम्यान घराबाहेर पडण्यास बंदी. 
- वैद्यकीय बाबी व जीवनावश्‍यक बाब वगळता पासष्ट वर्षावरील नागरिक, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती, गर्भवती व दहा वर्षाखालील मुलांना घराबाहेर पडण्यास पूर्णपणे मज्जाव. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission of administration for these businesses in Pune district