esakal | उजनी जलाशयातून इंदापूरसाठी पाच टीएमसी पाणी उचलण्यास परवानगी

बोलून बातमी शोधा

ujani water
उजनी जलाशयातून इंदापूरसाठी पाच टीएमसी पाणी उचलण्यास परवानगी
sakal_logo
By
राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी सरकारने ५ टीएमसी पाणी उचलण्यासाठी परवानगी दिल्यामुळे आजचा दिवस इंदापूरकरासांठी ऐतिहासिक ठरला. उजनीच्या पाण्यामुळे तालुक्यातील २२ गावांसह तालुक्यांतील ५८ गावांचा शेतीचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे. तालुक्यातील सुमारे ६५ हजार एकरांवरील शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळणार आहे. या प्रस्तावावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची स्वाक्षरी झाल्याची माहिती राज्यमंंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली. इंदापूर तालुक्यामध्ये राज्यातील सर्वात मोठे धरण असतानाही तालुक्याला उजनीचे पाणी मिळत नसल्याने 'धरण उशाला, कोरड घशाला' अशी परस्थिती होती. गेल्या पन्नास वर्षापासून तालुक्यातील २२ गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न प्रलंबित होता. पाण्याच्या प्रश्‍नावर अनेक निवडणूका झाल्या व गाजल्याही मात्र उजनीतून तालुक्यातील शेतीला पाणी देण्याचा प्रश्‍न प्रलंबितच राहिला होता. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी राज्यमंत्रीपदाच्या शपथेबरोबर तालुक्याचा पाणी प्रश्‍न सोडविण्याचीही शपथ घेतली होती.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरापासून भरणे यांचे शेतीच्या सिंचनाचा कायमस्वरुपी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु होते, अखेरीस त्याला यश आले. लाकडी-निंबोडी उपसा पाणी योजनेचा विषय मार्गी लागल्यानंतर त्यांनी उजनी जलाशयातून ५ टीएमसी पाणी उचलण्याची परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. गुरुवार (ता. २२) रोजी या प्रस्तावावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची अंतिम स्वाक्षरी झाली असून या योजनेला मूर्त स्वरूप आले आहे. गेल्या ५० वर्षांपासून पाणी प्रश्‍नासाठी जनता आग्रही होती. यासंदर्भात भरणे यांनी सांगितले की, कुंभारगाव परिसरातील उजनी जलाशयातून १० हजार एचपी क्षमतेच्या विद्युत पंपाद्वारे पाणी उचलले जाणार असून ते पाणी सुमारे १० किमी अंतरावरील शेटफळगढे परिसरातील खडकवासला कालव्यात टाकले जाणार आहे. तेथून हे पाणी सणसर कटद्वारे नीरा डाव्या कालव्यावरील २२ गावातील शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे. तर खडकवासला कालव्यातून इंदापूर पर्यंतच्या शेती सिंचनासाठीही पाणी वापरले जाणार आहे. दोन्ही कालव्यावरील सुमारे ६३ हजार एकर क्षेत्र ओलिता खाली येणार असून शेतकऱ्यांना कायमस्वरुपी पाणी मिळणार आहे.

हेही वाचा: पुणे : वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता जैववैद्यकीय कचऱ्यासाठी विघटन प्रकल्प

सदर योजनेसाठी सुमारे ६०० कोटी रुपयेचा निधी खर्च अपेक्षीत असून या योजनेसाठी दोन वर्षाचा कलावधी जाणार आहे. राज्यशासनाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातील १४३ गावापैंकी ५८ गावातील हजारो शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटणार आहे. सदरच्या योजनेचा सर्व्हे करण्याचा आदेश देण्यात आला असून चार महिन्यांमध्ये सर्व्हे पूर्ण केला जाणार असून त्यांनतर योजनेचा काम पूर्ण होणार अून जलसंपदा मंत्रालयाने याबाबत शासन निर्णय पारित केल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इंदापूर होणार सुजलम्-सुफलाम-इंदापूर तालुक्यातील २२ गावासह खडकवासल्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यामध्ये कालव्याचे पाणी मिळत नव्हते.यामध्ये शेतकऱ्यांची पिके शेवटच्या टप्यामध्ये जळून जात होती. उजनीतून ५ टीएमसी पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून शेतीच्या सिंचनाचा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटणार असून तालुका सुजलम् -सुफलाम होणार आहे. या याेजना मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची मोलाची मदत झाल्याचे भरणे यांनी सांगितले.

हेही वाचा: बारामती पोलिसांनी पकडला अडीच लाखांचा गुटखा