पेट्रोलचे दर 90 रुपयांच्या घरात

पेट्रोलचे दर 90 रुपयांच्या घरात

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक चटके सोसत असलेल्या नागरिकांना आता इंधन दरवाढीची झळही सोसावी लागत आहे. अनलॉक सुरू झाल्यापासून सुसाट असलेले पेट्रोल दरवाढीचे मीटर आता नव्वद रुपयांच्या घरात पोचले आहे. शहरात शुक्रवारी पेट्रोलची किंमत 89.19 रुपयांपर्यंत पोचली आहे.

एक जूनपासून लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या काही सवलतीनंतर पेट्रोल आणि डिझेलची विक्री वाढली होती. त्यामुळे तेव्हापासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (व्हॅट) एक जून रोजी राज्य सरकारने अधिभार वाढवला आहे. तसेच सुरवातीच्या लॉकडाऊनमुळे तीन महिने इंधन घेऊन आलेले जहाज समुद्रात थांबून होते. त्याचाही खर्च वाढला होता.

तसेच देशात इंधनाची मागणी एकदम वाढली होती. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर जूनमध्ये अचानक वाढले होते. त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये दरवाढ काहीशी मंदावली होती. मात्र आता नोव्हेंबर अखेरपासून पुन्हा दरवाढ होत आहे. गेल्या 15 दिवसांत पेट्रोल दीड रुपयांनी महागले आहे.

ही आहेत दरवाढीची कारणे ः
- युरोपीय देशांत वाढलेली इंधनाची मागणी
- कच्चा तेलाच्या बॅरलची किंमत 50 डॉलरच्या घरात
- आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत होत आहे
- अनलॉकमध्ये वाहनांचा अचानक वाढलेला वापर

दर नव्वदी पार जाण्याची शक्‍यता कमी ः
ज्या देशांत मोठ्या प्रमाणात थंड पडते तेथे उष्णतेसाठी अनेक साधने वापरली जातात. ही साधने पेट्रोल-डिझेलवर चालणारी असतात. त्यामुळे दरवर्षी या काळात तेथील मागणी वाढल्याने इंधनाचे दरही उसळतात. मात्र पेट्रोल 90 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्‍यता कमी आहे. येत्या चार ते पाच दिवसांत दर स्थिर होतील व थंडी कमी होईल त्यानुसार दरही काहीसे उतरतील, असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले.

तर तीन रुपयांनी किंमत कमी होतील ः
राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे मागील सरकारने इंधनावर तीन रुपयांचा दुष्काळ कर लावला होता. आता मात्र राज्यात दुष्काळाची परिस्थिती नाही. त्यामुळे तो कर मागे घेतला तर इंधनाचे दर आपोआप तीन रुपयांनी कमी होईल. त्यातून वाहन चालकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्‍वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.

जूनमध्ये सर्वाधिक झळ ः
दुचाकीसह नियमित चारचाकी वाहनाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला बसणारी चाट जून महिन्यात 18.35 रुपयांनी वाढली आहे. जूनमध्ये डिझेलच्या किमतीत 10.36 तर पेट्रोल 7.99 किमतीत रुपयांनी वाढ झाली होती. कोरोना पूर्वीच्या तुलनेत सध्या 70 टक्के पेट्रोल-डिझेलची दररोज विक्री होत आहे.

इंधनाचे दर
1 जून
पेट्रोल 78.09 रुपये
डिझेल 66.99 रुपये
सीएनजी 53.80 रुपये

1 जुलै
पेट्रोल 86.89 रुपये
डिझेल 77.35 रुपये
सीएनजी 54.80 रुपये

1 ऑगस्ट दर
पेट्रोल 86.89 रुपये
डिझेल 78.67 रुपये
सीएनजी 54.80 रुपये

1 सप्टेंबर
पेट्रोल 88.50 रुपये
डिझेल 78.51 रुपये
सीएनजी 54.80 रुपये

1 ऑक्‍टोंबर
पेट्रोल 87.51 रुपये
डिझेल 75.48 रुपये
सीएनजी 54.80 रुपये

1 नोव्हेंबर
पेट्रोल 87.51 रुपये
डिझेल 75.71 रुपये
सीएनजी 53.80 रुपये

1 डिसेंबर
पेट्रोल 88.83 रुपये
डिझेल 77.71 रुपये
सीएनजी 53.80 रुपये

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com