'या' शहराला मंत्रिपदाचे 'दिवा'स्वप्नच!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले होते. मात्र, मुख्यमंत्रिपद व खाते वाटपावरून त्यांच्यात गेल्या पंधरा दिवसांपासून ओढाताण सुरू होती.

पिंपरी : राज्यात सत्ता स्थापन करण्यास भारतीय जनता पक्षाने रविवारी (ता. 10) असमर्थता दर्शविल्याने शहराला मंत्रिपद मिळण्याच्या आशा मावळल्या आहेत. कारण, सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेना करण्याची शक्‍यता आहे आणि शहरातील तीनपैकी दोन आमदार भाजपचे आणि एक राष्ट्रवादीचा आहे. 

शहरातील चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुक्रमे लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे विजयी झाले आहेत. जगताप यांनी हॅटट्रिक साधली असून, त्यांना यापूर्वी विधानसभेचा दोन व विधान परिषदेचा एक वेळेचा अनुभव आहे. तसेच, लांडगे दुसऱ्यांदा सभागृहात पोचले आहेत. त्यामुळे जगताप वा लांडगे यांच्या रूपाने शहराला मंत्रिपद मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या होत्या.

- तर आणि तरच आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ - राष्ट्रवादी

शिवाय, विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी दोघांनीही मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे शहराला लाल दिवा मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले होते. मात्र, मुख्यमंत्रिपद व खाते वाटपावरून त्यांच्यात गेल्या पंधरा दिवसांपासून ओढाताण सुरू होती. अखेर तोडगा न निघाल्याने सत्ता स्थापन करण्यास भाजपने रविवारी असमर्थता दर्शवली. त्यामुळे महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, शहराला मंत्रिपद मिळण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. 

- काँग्रेसमध्येही उभी फूट; 'या' कारणांमुळे आमदारांत दुमत

गेल्या वर्षापासून चर्चा 

सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत तत्कालिन पालकमंत्री गिरीश बापट विजयी होऊन संसदेत गेले. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळातील त्यांची जागा रिक्त झाली होती. त्यावर चिंचवडचे लक्ष्मण जगताप, भोसरीचे महेश लांडगे यांच्यासह मावळातील बाळा भेगडे यापैकी एकाची वर्णी लागणार याची चर्चा झाली. तिघेही मंत्रिपदासाठी इच्छुक होते.

अखेर भेगडे यांना राज्यमंत्रिपद मिळाले आणि शहराला मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. मात्र, काही महिन्यांच्या कालावधीत विधानसभा निवडणूक झाली. त्यात मावळातून पराभूत झाल्याने भेगडे यांचा मंत्रिपदाचा पत्ता कट झाला आणि शहरातील जगताप व लांडगे यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आता रविवारच्या घडामोडींनंतर त्यांच्या आशेवरही पाणी फिरले आहे. 

- भाजप-सेना युती तुटली? घोषणा बाकी

हॅटट्रिक साधूनही 'दिवा' नाही 

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांनी हॅटट्रिक साधली आहे. शिवाय, विधान परिषद सदस्यत्वाचा त्यांना सहा वर्षांचा अनुभव आहे. म्हणजेच 16 वर्षांचा त्यांना विधीमंडळातील अनुभव आहे. तरीही त्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही, हे उघड सत्य आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri city will not get a minister due to BJPs inability