पिंपरी पोलिसांनी दोनशे चोरींची वाहने शोधली 

पिंपरी पोलिसांनी दोनशे चोरींची वाहने शोधली 

पिंपरी - पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहनचोरींचे प्रमाण वाढले असून, गेल्या वर्षभरात तब्बल एक हजार 290 वाहनांची चोरी झाली आहे. यापैकी केवळ 199 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून हे प्रमाण अवघे 15 टक्के आहे. 

आयुक्तालयाच्या हद्दीत 2019 मध्ये पंधरा पोलिस ठाण्यांमध्ये एक हजार 290 वाहनचोरींचे गुन्हे दाखल झाले. यामध्ये दुचाकी, तीनचाकी वाहनांसह अलिशान मोटारींचाही समावेश आहे. चोरटे दुचाकी वाहनांना अधिक लक्ष्य करीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने वाहनमालकांचे मोठे नुकसान होत आहे. 

दिवसाला चार वाहने चोरीला 
वर्षात 1 हजार 290 म्हणजेच शहरात दिवसाला सरासरी चार वाहने चोरीला जात आहेत. पोलिसांत तक्रार दिली जाते. मात्र, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्या तपासाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया केवळ कागदपत्रांपुरतीच मर्यादित असते. 

लाखोंची मोटारही "लक्ष्य' 
बहुतांश मोटारी एकाच पद्धतीने चोरीला जात असल्याचे दिसते. अलिशान मोटारीतून आलेले चोरटे चार ते पाच फूट अंतरावर त्यांची मोटार थांबवितात. त्यांच्याकडील तांत्रिक यंत्रणेद्वारे मोटारीचे सेंट्रल लॉक डीऍक्‍टिव्हेट केले जाते. त्यानंतर "मास्टर की'द्वारे मोटार सुरू करून चोरटे पसार होतात. निगडी, यमुनानगरमधील सेक्‍टर क्रमांक 23 येथील एका घरासमोर उभी केलेली अलिशान मोटार चोरीला गेल्याची घटना 7 ऑगस्ट 2019 ला घडली. ही मोटार चोरण्यासाठी चोरटे अलिशान मोटारीतून आल्याचे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे स्पष्ट झाले होते. पंधरा ते वीस लाख रुपये किंमतीच्या मोटारी काही क्षणात गायब होत असल्याने वाहनमालकांमध्ये भीती पसरली आहे. 

पथक केवळ नावापुरतेच 
वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासह या घटना रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, तरीही वाहनचोरीचे गुन्हे रोखण्यात यश आलेले नाही. त्यामुळे हे पथक केवळ नावापुरतेच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

दुचाकीचोरी हजारावर 
दुचाकीचे हॅंडल लॉक तोडून, बनावट चावीचा वापर करून सहजरीत्या दुचाकी पळविली जाते. घरासमोरील पार्किंगसह रस्त्यावरूनही राजरोसपणे दुचाकी गायब होतात. चोरीला गेलेल्या दुचाकींमध्ये महागड्या दुचाकींचा समावेश आहे. 1 जानेवारी ते 31 नोव्हेंबर या अकरा महिन्यांत एक हजार 190 वाहने चोरीला गेली. यामध्ये तब्बल एक हजार 54 दुचाकींचा समावेश असून 110 चारचाकी व 26 तीनचाकी वाहनांचा समावेश आहे. 

2019 मधील वाहनचोरींचे गुन्हे - 1290 
उघड झालेले गुन्हे - 199 
दिवसाला सरासरी चोरी होणारी वाहने - 4 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com