'नमस्ते, तुम्ही स्वत:ची काळजी घेत आहात ना?' पंतप्रधानांनी केली पुण्यातील नर्सेसची विचारपूस!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

नायडू हॉस्पिटलमध्ये सात रुग्ण बरे होऊन गेले आहेत, तर सध्या नऊ रुग्ण उपचार घेत आहेत, त्या सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे : "तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना, कोरोनाचे पेशंट हाताळताना तुमच्या नेमक्या काय भावना असतात,  तुम्ही हे काम करीत असल्याने तुमचे कुटुंबीय चिंतेत तर नाहीत ना, नीट काळजी घ्या, आपण सर्वजण मिळून कोरोनाला देशातून घालवूयात," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील नायडू हॉस्पिटलमधील नर्स छाया जगताप यांची फोनवरून विचारपूस केली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान कार्यालयातून आज रात्री पावणेआठच्या सुमारास छाया यांना मोदींचा फोन आला आणि त्यांनी नर्सेसचे काम कसे सुरू आहे, याची माहिती घेत रुग्णालयातील नर्सेसची विचारपूस केली त्यांना धीर दिला. पंतप्रधान मोदी यांनी मराठीत 'तुम्ही स्वतःची काळजी नीट घेतात ना', असे विचारून संभाषणाला सुरुवात केली. तुम्ही एवढ्या जोखमीच्या ठिकाणी काम करत आहात मग तुमच्या परिवाराला तुमच्याविषयी काळजी वाटत असेल ना, असेही मोदी यांनी विचारले.

- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'नीट' परीक्षेस स्थगिती!

याशिवाय जेव्हा रुग्णालयात पेशंट येतात तेव्हा ते घाबरलेले असतात का? त्यांच्याशी तुम्ही कसा संवाद साधता, पेशंटला कसा धीर देता, त्यांच्यातील भीती कशी घालता आणि तुम्ही आपल्या स्वतःच्या परिवाराला ही कसे आश्वस्त करता, अशी चौकशीही पंतप्रधान मोदी यांनी केली.  

पेशंटची भीती घालवण्यासाठी नर्सेस काय करतात याची माहिती छाया यांनी पंतप्रधानांना दिली. देशभरात हजारो नर्सेस या रोगाचा सामना करण्यासाठी काम करत आहेत, त्या सर्वांना शुभेच्छा देत मोदी यांनी त्यांचे आभारही मानले. छाया यांनीही पंतप्रधानांना तुम्ही आवर्जून फोन केला, याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.

- शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी; पीककर्ज परतफेडीला मुदतवाढ!

छाया जगताप या नायडू रुग्णालयात गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत आहेत. स्वाईन फ्लूच्या काळातही त्यांनी अनेक पेशंट हाताळले आहेत. "आमच्या घरच्यांना आमच्याविषयी खरोखरीच चिंता असते, पण आम्ही पूर्ण काळजी घेऊन काम करत असतो. कुठल्याही पद्धतीने संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतो, असे छाया यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

- हे नियम मोडल्यास सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद..

नायडू हॉस्पिटलमध्ये सात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर सध्या नऊ रुग्ण उपचार घेत आहेत, त्या सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनाही लवकरच डिस्चार्ज मिळेल, असेही त्या म्हणाल्या. हॉस्पिटलच्या वतीने इथला सर्व कर्मचारी वर्ग, डॉक्टर्स आणि नर्सेस यांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi talked with chhaya sisters of Naidu Hospital Pune