विमान, रेल्वे, रिक्षा, कॅब सुरू आहेत, मग पीएमपीच का बंद?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जुलै 2020

पीएमपीचे संचालक शंकर पवार यांनीही गेल्या महिन्यात दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांना पत्र पाठवून बससेवा सुरू करण्याची परवानगी मागितली होती.

पुणे : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीच्या बसची वाहतूक सुरू करण्यात यावी, अशी मागणी पीएमपीने पुन्हा दोन्ही महापालिकांकडे गुरुवारी (ता.३०) एका पत्राद्वारे केली. विमान, रेल्वे, रिक्षा, कॅब सुरू आहेत, मग पीएमपीच का बंद ठेवायची, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंच्या नियमांची अंमलबजावणी करून ही वाहतूक सुरू करण्यात येईले, असेही पीएमपीने स्पष्ट केले आहे. 

दोन्ही शहरांतील जनजीवन काही प्रमाणात सुरळीत होऊ लागले आहे. परंतु, बससेवा बंद असल्यामुळे विशेषतः कष्टकऱ्यांचे हाल होत आहेत. रिक्षा आणि कॅब परवडत नसल्यामुळे त्यांना पर्याय उरलेला नाही. पीएमपीचे संचालक शंकर पवार यांनीही गेल्या महिन्यात दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांना पत्र पाठवून बससेवा सुरू करण्याची परवानगी मागितली होती.

मुंबई आटोक्‍यात येते, तर पुणे का नाही? मुख्यमंत्र्यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी!​

या पार्श्वभूमीवर पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दोन्ही महापालिकांच्या आय़ुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करून दोन्ही शहरांतील वाहतूक सुरू करता येईल. राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बसच्या क्षमतेच्या निम्मचे प्रवासी घेऊन वाहतूक सुरू करता येईल. दोन्ही शहरांतील लांबच्या मार्गांवर पहिल्या टप्प्यात वाहतूक सुरू करण्यात येईल. प्रतिबंधक क्षेत्रात बसची वाहतूक होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. टप्प्याट्प्याने वाहतूक सुरू केल्यास नागरिकांचीही सोय होईल. रेल्वे आणि विमानसेवा सुरू झाली आहे. रिक्षा आणि कॅबचीही शहरात वाहतूक सुरू आहे, त्यामुळे आता पीएमपीला परवानगी देण्यात यावी. 

जिल्हाअंतर्गत वाहतुकीच्या निर्णयाबाबत पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण; वाचा काय म्हणतात पोलिस?

पीएमपीची प्रवासी वाहतूक १८ मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद झाली आहे. दोन्ही शहरांतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूकच सध्या पीएमपीकडून सुरू आहे. त्यासाठी सुमारे २२५ बस धावत आहेत. या बसमधून प्रवास करून द्यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. त्यासाठी त्यांचे दररोज वाहक आणि चालकांशीही वाद होत आहेत, असेही पत्रात निदर्शनास आणून देण्यात आले आहे.  

या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर काय निर्णय घेतात, याकडे पीएमपी प्रशासनाचे लक्ष लागले आहे. पीएमपीची सेवा सुरू करावी, अशी जोरदार मागणी प्रवासी संघटनांकडूनही होत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMPML again demands permission to start transport in Pune and Pimpri Chinchwad