गुन्हेगाराकडं होतं पोलिसांचं ओळखपत्र; त्याला पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

मेमनविरुद्ध शहरातील हडपसर, वानवडी पोलिस ठाण्यामध्ये खंडणी, दहशत निर्माण करणे, वाहनांची जाळपोळ अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

पुणे : दंगल, जाळपोळ, खंडणी असे वेगवेगळे गुन्हे त्याच्या नावावर होते. पुणे पोलिसांच्या रेकॉर्डनुसार तो सराईत गुन्हेगार होता. स्वतःच्या गुन्हेगारी कारवायांना पोलिसांचा त्रास होऊ नये आणि नागरीकांमध्येही भिती राहावी, यासाठी तो थेट पुणे पोलिसांचेच ओळखपत्र जवळ बाळगत होता. हा तोतया पोलिस पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले, तेव्हा त्याचे खरे रुप पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा यथोचित समाचार घेत कायदेशीर धडा शिकविला! 

चोरट्यांची 'छप्पर फाड के' चोरी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर मारला डल्ला​

इम्तियाज इद्रीस मेमन (रा. हडपसर) असे त्याचे नाव आहे. मेमनविरुद्ध शहरातील हडपसर, वानवडी पोलिस ठाण्यामध्ये खंडणी, दहशत निर्माण करणे, वाहनांची जाळपोळ अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेच्या युनीट पाचच्या पथकातील पोलिस कर्मचारी हडपसर परिसरामध्ये गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना इम्तियाज मेमन हा पोलिसांचे ओळखपत्र स्वतःजवळ बाळगत असल्याची खबर नागरीकांनी दिली. त्यानंतर पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, शेंडगे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलिस कर्मचारी भरत रणसिंग, दया शेगर, अंकुश जोगदंडे यांनी त्यास सापळा लावून त्याला पकडले.

'अंतिम'च्या परीक्षेची अडचणी पाठ सोडेनात; मराठीच्या पेपरमधून पर्यायच झाले गायब!​ 

पोलिसांनी मेमनची झडती घेतली, त्यावेळी त्याच्याकडे पुणे पोलिसांचे 2007 मधील ओळखपत्र आढळले. संबंधीत ओळखपत्रावर त्याने स्वतःचे नाव, खरी जन्मतारीख आणि छायाचित्र लावले होते. पोलिसांनी त्याच्याकडे पोलिसांच्या बनावट ओळखपत्राबाबत विचारणा केली, त्यावेळी त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने खरी माहिती दिली. मेमन याच्याविरुद्ध विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली. त्याच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करुन त्यास अटक केली. अशी माहिती पोलिस उपायुक्त सिंग यांनी दिली आहे. 

पुण्यात ऐन गर्दीच्या ठिकाणी थरार; शिवीगाळ केली म्हणून मित्रालाच चाकूने भोसकले​

तर पोलिसांशी संपर्क साधा
मेमन याने पोलिसांचे बनावट ओळखपत्र स्वतःजवळ बाळगून काही गुन्हे केलेले असू शकतात. याच पद्धतीने कोणी पोलिस असल्याची बतावणी करीत असल्याचा नागरीकांना संशय आल्यास, त्यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकावर, वरिष्ठ पोलिस अधिकारी किंवा संबंधीत पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested a criminal who carrying a police identity card