बेशिस्त रिक्षाचालक, अतिक्रमणांवर पोलिसांकडून जेधे चौकात कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

अशी झाली कारवाई 
५६ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई  
१४ हजार ६०० रुपये वसूल केलेला दंड
४३ पोलिसांनी केलेल्या वाहनांची तपासणी             
१२ बेकायदा स्टॉलधारक, विक्रेत्यांविरुद्ध दाखल खटले 

पुणे - स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकातील अतिक्रमणे व वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. अखेर वाहतूक पोलिस व स्वारगेट, दत्तवाडी पोलिसांनी रविवारी अनधिकृत स्टॉलधारक व बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी रिक्षा चालकांनाही शिस्तीचे धडे दिले. या कारवाईमुळे जेधे चौकाने मोकळा श्‍वास घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पदपथांवरील स्टॉलधारकांचे अतिक्रमण, रिक्षा, खासगी ट्रॅव्हल्स व खासगी वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडत होती. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या सूचनेनंतरही पोलिसांकडून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्याविषयी नागरिकांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

पुणे : शेतकऱ्यांनी परतवला बिबट्याचा हल्ला 

या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी यासंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी स्वारगेट पोलिस ठाणे, दत्तवाडी पोलिस ठाणे व स्वारगेट वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई करण्यास सांगितले. रविवारी दुपारी तीनपासून कारवाईला सुरुवात झाली. स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर, स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी यांनी पायी गस्त घातली. त्यानुसार, जेधे चौक ते पंचमी हॉटेल या दरम्यानचे बेशिस्त पद्धतीने वाहने लावणे, पियागो, रिक्षा, अन्य खासगी वाहतूक, खासगी ट्रॅव्हल्स यांच्यासह बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. पदपथावर अतिक्रमण करून पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या, विक्रेत्यांवरही या वेळी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ३० ते ३५ अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

मुलाचा जीव जाऊनही पालिकेत फक्त चर्चाच  

दरम्यान, स्वारगेट एसटी स्थानक, बसस्थानक परिसरातील रिक्षाथांब्यावर थांबणाऱ्या रिक्षाचालकांची या वेळी बाबर यांनी बैठक घेतली. चौकामध्ये रिक्षामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा लावण्याबाबत त्यांना सूचना केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police crime on rickshaw drier and encroachment in jedhe chowk