अजब पोलिसांची गजब कारवाई; नाश्‍ता करणाऱ्या विद्यार्थीनींकडून विनापावती केली दंडवसुली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाकडून मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांकडून ५०० रुपये दंड आकारण्यास काही दिवसांपासून सुरवात झाली आहे.

पुणे : वेळ शुक्रवार सायंकाळी साडेसहाची, ठिकाण कोरेगाव पार्कमधील लेन नं ७. इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी तिच्या वर्गमैत्रीणीकडे अभ्यासाच्या वह्या घेण्यासाठी गेली. त्यावेळी विद्यार्थिनी भूक लागल्याने तिच्या मैत्रीणीसमवेत तेथील कॅन्टीनजवळ नाश्‍ता करत होती. त्याचवेळी तेथे पोलिस दाखल झाले, महिला पोलिसांनी विद्यार्थिनींनी मास्क घातला नाही, म्हणून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारला, शिवाय पावतीही दिली नाही, या उदाहरणाद्वारे मास्कच्या नावाखाली पोलिसांकडून सुरू असलेला गैरप्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

आयुक्त-महापौरांच्या भूमिकेमुळं पुणेकरांची झालीय कोंडी; महापालिका प्रशासनात 'गोंधळ'!​

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाकडून मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांकडून ५०० रुपये दंड आकारण्यास काही दिवसांपासून सुरवात झाली आहे. परंतु या दंडवसुलीचा मात्र पोलिसांकडून अतिरेक होत असल्याची उदाहरणे सातत्याने पुढे येऊ लागली आहे. मास्क परिधान न केल्यास जरूर कारवाई करावी. मात्र, मास्कच्या नावाखाली नागरिकांची लूट करू नये, अशी तक्रार नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. त्यातच शुक्रवारी सायंकाळी कोरेगाव पार्कमध्ये दोन शालेय विद्यार्थीनींकडूनच पोलिसांनी दंडवसुली केल्याची घटना घडली. 

'पुण्यातील सेवेचा प्रवास कायम आठवणीत राहील'; डॉ. वेंकटेशम यांचा भावनिक संदेश​

या प्रकाराबाबत विद्यार्थीनीचे आजोबा अबुशेठ तांबे म्हणाले, "माझी नात इयत्ता नववीमध्ये शिकते. शुक्रवारी सायंकाळी ती रिक्षाने कोरेगाव पार्क येथे राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीकडे अभ्यासाच्या वह्या आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी दोघींना भूक लागल्याने त्या कोरेगाव पार्कमधील लेन क्रमांक सातमधील एका कॅन्टीनजवळ नाश्‍ता करत होत्या.

नाश्‍ता करत असताना त्यांनी मास्क काढून ठेवला होता. त्यावेळी तेथे काही पोलिस आले. त्यामधील महिला पोलिसांनी दोघींकडे मास्क न घालण्याबाबत विचारणा केली. तसेच दोघींकडून प्रत्येकी ५०० रुपये घेतले. त्यांना त्याची पावती देखील दिली नाही. माझ्या नातीने घरी आल्यानंतर हा प्रकार आम्हाला सांगितला, तसेच या प्रकारामुळे घाबरल्याने ती रडू लागली.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police recovered fines from schoolgirls who had breakfast at Koregaon Park