पोलिसाची कमाल : दहा तोळ्याचे दागिने आणि मोबाईल मिळवून दिला दोन तासात!

पोलिसाची कमाल : दहा तोळ्याचे दागिने आणि मोबाईल मिळवून दिला दोन तासात!

मंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (ता. आंबेगाव) येथील हॉटेल रविकिरणमध्ये दहा तोळे सोन्याचे दागिने व मोबाईल असलेली अर्चना संजय मोहिते (रा. कळंबोली, मुंबई) यांची विसरलेली पर्स नजरचुकीने वऱ्हाडी मंडळीच्या गाडीत श्री क्षेत्र आळंदी परिसरात गेली. मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक सोमनाथ वाफगावकर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे गतिमान तपास करून दोन तासांत मोबाईल व सोन्याच्या दागिन्यासह पर्स मोहिते यांना मिळवून देण्याचे काम केले. वाफगावकर याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

संजय बजरंग मोहिते व त्यांची पत्नी अर्चना शनिवारी (ता. १९) हॉटेल रविकिरण येथे चहापाणी करण्यासाठी थांबले होते. त्यानंतर मुंबई येथे कारमधून निघाले. मंचरच्यापुढे गेल्यानंतर पर्स हॉटेलच्या टेबलवर विसरल्याचे अर्चना यांच्या लक्षात आले. ताबोडतोब अर्चना व संजय रविकिरण आले. पण तेथे पर्स नव्हती. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची पाहणी केली. पण पर्स विसरलेल्या ठिकाणचा कॅमेरा बंद होता. त्यामुळे मोहिते दामपत्याची अस्वस्थता वाढली.

मंचर पोलिस ठाणे येथे पोलिस नाईक तुकाराम मोरे यांना सदर घटनेची माहिती कळविली. घटनास्थळी वाफगावकर आले. पर्स मधील मोबाईलचा क्रमांक सायबर क्राईम पोलिसांना कळविला. लाईव्ह लोकेशन आळंदी फाटा ते आळंदी रस्त्यावर असल्याचे समजले. हॉटेल रविकिरणचे मालक युवराज कानडे यांनी हॉटेलमध्ये पुणे येथील एका कुटुंबियांचे लग्नसमारंभ असल्याचे सांगितले. त्यावेळी वाफगावकर यांनी सदर लग्न प्रमुख लक्ष्मण खोसे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. खोसे यांनी वऱ्हाडाच्या सर्व गाड्या रस्त्यात थांबून पाहणी केली.

त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की नजरचुकीने टेबलवर राहिलेली काळ्या रंगाची पर्स एका गाडीत आली आहे. त्यानंतर मोहिते दामपत्याने लक्ष्मणराव खोसे यांच्या घरी जाऊन दागिण्यांची पर्स ताब्यात घेतली. त्यांनी खोसे व वाफगावकर यांचे अभिनंदन केले.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com