पिंपरी-चिंचवड महापालिका भवनावरून राजकारण

PCMC
PCMC

पिंपरी - ‘आयटूआर’अंतर्गत (औद्योगिक ते निवासी) प्राप्त भूखंडावर महापालिकेसाठी नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचे नियोजन सत्ताधारी भाजपने केले आहे. त्याबाबतचा ठरावही मंजूर केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रकल्पाचे सादरीकरण झाल्यानंतरच इमारतीबाबत निर्णय घ्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.

महापालिकेची सध्याची इमारत पुणे-मुंबई महामार्गालगत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते अहल्यादेवी होळकर चौकादरम्यान आहे. १३ मार्च १९८७ रोजी उद्‌घाटन झाल्यापासून इमारत वापरात आहे. आठ वर्षांपूर्वी इमारतीचे विस्तारीकरण करण्यात आले. मात्र, विविध विभाग व कार्य विस्तारामुळे इमारत कमी पडू लागली आहे. जागेअभावी क्रीडा विभाग व एलबीटी विभाग अन्य इमारतींमध्ये स्थलांतरीत केला आहे. शिवाय, आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या कामकाजासाठी वेगवेगळ्या भागात स्वतंत्र इमारती आहेत. सध्याचे वाहनतळही अपूर्ण आहे. महापालिकेत येणारे नागरिक, पाहुणे, ठेकेदार यांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागत आहेत. शिवाय लोकसंख्येच्या प्रमाणात आणखी विस्तार होणार आहे. त्यासाठी नवीन इमारत उभारणे गरजेचे असल्याची भाजपची भूमिका आहे. नवीन इमारतीसाठीचा भूखंड सध्याच्या इमारतीपासून पाचशे मीटर अंतरावर आहे. त्या इमारतीसाठी २५० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. जुनी व नवीन इमारत जोडण्यासाठी रॅम्प उभारण्याचेही नियोजन आहे. 

‘राष्ट्रवादी’च्या मत
महापालिकेची नवीन इमारत ५० वर्षांचा विचार करून बांधणे अपेक्षित आहे. शहराच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या व्यक्तींचा यात विचार होणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेत सत्ताधारी असलेल्या काही ठराविक नेत्यांच्या दबावाखाली येऊन हा विषय मनमानी पद्धतीने रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे इमारत प्रकल्पाचे सादरीकरण करावे. नंतरच निर्णय घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. मात्र, त्यांचा आदेश व स्थानिकांना डावलून केवळ सत्ताधाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने पावले उचलत असून, इमारतीबाबत आर्थिक हितसंबंधासाठी घाई चालविली आहे. त्यामुळे आयुक्तांनी निविदा प्रक्रिया तत्काळ थांबवावी. शहराच्या शिरपेचात तुरा रोवणारी इमारत ठरावी. सर्वसुविधांनी युक्त असावी. 

प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सर्व गोष्टी योग्य पद्धतीने असाव्यात. इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज, अण्णासाहेब मगर यांचे पुतळे उभे करावेत. सादरीकरण व अपेक्षित बदल केल्यानंतरच निर्णय घ्यावा. अन्यथा, राज्य सरकारकडे तक्रार करून आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिला 
आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com