बाप रे, केमिकलचे सांडपाणी सोडलेला तलाव भरलाय...आता उजनीला... 

सावता नवले
Tuesday, 28 July 2020

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औदयोगिक वसाहतीतील कंपन्यांनी अनेक दिवसांपासून टाक्यांमध्ये साठून ठेवलेले हजारो लिटर रसायनमिश्रीत सांडपाणी पावसाच्या पाण्यात ओढयाला सोडले. हे प्रदुषित सांडपाणी चार किलोमीटर अंतरावरील मळद तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने

कुरकुंभ (पुणे) : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औदयोगिक वसाहतीतील कंपन्यांनी अनेक दिवसांपासून टाक्यांमध्ये साठून ठेवलेले हजारो लिटर रसायनमिश्रीत सांडपाणी पावसाच्या पाण्यात ओढयाला सोडले. हे प्रदुषित सांडपाणी चार किलोमीटर अंतरावरील मळद तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने मळद, रावणगाव, नंदादेवी, स्वामी चिंचोली हद्दीतील ओढयांद्वारे 25 किलोमीटर अंतरावरील उजनी धरणात जात आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी प्रदुषणात आणखी वाढ होणार आहे.

थरार...बिबट्याच्या मागे काठी घेऊनच धावला मेंढपाळ, पण...

कुरकुंभ औदयोगिक वसाहतीत केमिकल झोन असल्याने परिसरातील रायायनिक उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांची संख्या अधिक आहे. या रासायनिक कंपन्यांमध्ये उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात घातक व ज्वलनशील पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे कंपन्यांमधून बाहेर पडणारे रसायनमिश्रीत सांडपाणी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे कंपन्यांना वैयक्तीक किंवा सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रियेसाठी पाठविणे बंधनकारक आहे. मात्र, शासनाने घालून दिलेले नियम धाब्यावर बसून रसायनमिश्रीत सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी येणारा खर्च वाचवून जास्त नफा कमविण्यासाठी कोणतीही प्रक्रिया न करता घातक सांडपाणी पावसाचा फायदा घेऊन सोडून देतात.

आळंदीत सुरू आहे धक्कादायक प्रकार, दिसली जागा की टाकला... 

हे रसायनमिश्रीत सांडपाणी चार किलोमीटरवरील मळद तलावात साठते. हा तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने हे पाणी मळद, रावणगाव, नंदादेवी, खडकी, स्वामी चिंचोली हद्दीतील ओढयावरील बंधारे भरून पुढे 25 किलोमीटरवरील भिगवण (ता. इंदापूर) येथे उजनी धरणाच्या पाण्यात मिसळत आहे. त्यामुळे कुरकुंभ, पांढरेवाडीनंतर आता मळद, रावणगाव,  नंदादेवी, खडकी, स्वामी चिंचोली येथील ओढयालगतचे पाण्याचे स्त्रोत दुषित होणार आहेत. 

मंदिर बंद असले तरी या ग्रामस्थांनी अशी सांभाळली परंपरा... 

या ओढयातील पाण्यावर मोठ्या प्रमाणात पांढरा फेस दिसून येत असून, उग्रवास जाणवत आहे. याचा त्रास ग्रामस्थ व शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. कंपन्यांकडून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळत आहेत. प्रदूषणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रदूषण मंडळ व प्रशासनाने ठोस उपाययोजना करून प्रदूषणाला आळा बसविण्यासाठी प्रक्रिया न करता रसायनमिश्रीत सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पीडित गावांमधील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pollution in lakes in Daund taluka due to release of chemical effluents