Positive Story : दोन्ही हात नसताना जयंत यांनी केला वकीलीपर्यंत प्रवास

समाधान काटे
Thursday, 22 October 2020

आम्हास दया, करुणा दाखवून लाचार न करता आमच्या मनात जगण्यासाठीची जिद्द निर्माण करून आम्हाला सुध्दा सुदृढ लोकांप्रमाणे वागणुक द्यावी.

पुणे : "माझा मुलगा जन्मजातच दोन्ही हातांनी अपंग असल्याने लहानपणी त्याला अनाथाश्रमात सोडण्याचा सल्ला अनेकांनी दिला. मी मात्र खंबीर होऊन जसा आहे, तसा मुलगा  घडवायचा या निर्धारात होते. माझ्या या मातृत्वाने मुलाला वकील केलं. तो आता आत्मनिर्भर होऊन स्वाभिमानाने जगतोय." असं सांगत होत्या दोन हात नसलेल्या अॕड जयंत इरण्णा गाजुल यांच्या आई.

अॕड. जयंत गाजुल यांना जन्मजात दोन हात नसल्याने हार न मानता अपंगत्वावर मात करून त्यांनी वकिलीची पदवी मिळवली तसेच या वर्षी म्हणजे २०२० मध्ये त्यांची युनीयन आॕफ इंडियाच्या नोटरी पदाकरीता निवड झाली. गुन्हेगारी, कौटुंबिक वादविवाद अशा अनेक केस त्यांनी जिकल्या आहेत. रास्ता पेठेत राहायला असून जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर येथे ते नियमित कामासाठी जातात.

हेही वाचा - बारामतीत महावितरण यंत्रणांची उंची चार फूटांने वाढवणार

१९६४ मध्ये पुण्यात गाजुल यांचा जन्म झाला. वैद्यकीय चुकांमुळे त्यांना जन्मजातच दोन्ही हात गमवावे लागले. अपंगत्वाचा बाऊ न करता, येणाऱ्या संकटाशी दोन हात करायला त्यांच्या आईने (विजया गाजुल) शिकवले. जयंत चौथीपर्यंत असतांना आई शाळेत येत असत. त्यानंतर जयंत एकटे शाळेत जायला शिकले. पायाने लिहायला आईने शिकवलं असल्याचे जयंत आवर्जुन सांगतात. १२ वी नंतर विधीचा पाच वर्षे अभ्यासक्रम पूर्ण करत असताना पश्चिम जर्मनी येथे जाऊन कॉम्प्युटर आॕपरेटर कोर्स देखील पूर्ण केला.

१९८८ साली लग्नानंतर  (आकाश,अतिष) ही दोन मुले झाली.सध्या त्यांना एक सून देखील असून त्या वडिलांप्रमाणे सांभाळ करतात. जयंत पायाने लिहणे, दाढी करणे, केस विंचरणे, चित्र काढणे, कॕरम खेळणे इत्यादी कामं करतात. जयंत यांच्या घरच्यांनी त्यांना कधीच अपंग म्हणून हिणविले नाही.

हेही वाचा - जागते रहो! शेतकऱ्यांना करावी लागतेय कांद्याची राखण कारण...

"आम्हास दया, करुणा दाखवून लाचार न करता आमच्या मनात जगण्यासाठीची जिद्द निर्माण करून आम्हाला सुध्दा सुदृढ लोकांप्रमाणे वागणुक द्यावी".
         - अॕड.जयंत गाजुल
 
"तुमच्या वाटेला चुकून असं मूल जन्माला आलं तर त्याला तुम्ही योग्य शिक्षण द्या, योग्य मार्ग दाखवा. ते मुल पुढे तुमचं नाव उज्ज्वल करेल".
    - विजया गाजुल,अॕड.जयंत गाजुल या़ंच्या आई

"अॕड.जयंत गाजुल यांना मी खूप वर्षांपासून ओखळते. ते सुद्धा माझ्यासोबतच नोटरी झालेले असून आम्ही एकाच दुकानात नोटरीचं काम करतो. शरीराने अपंग असले तरी, त्यांचं काम ते इमानदारीने पार पाडतात"
        - अॕड. उल्का बाबासाहेब इंगवले, शिवाजीनगर पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: positive story adv jayant gajul from pune completed law course without hands disable