esakal | चांदीच्या दागिन्यांना अधिक पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

बाप्पा

चांदीच्या दागिन्यांना अधिक पसंती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणरायाच्या लोभस मूर्तीला विविध दागिन्यांनी सजवण्यासाठी सराफ व्यावसायिकांकडे गर्दी होवू लागली आहे. जानवं, किरीट, श्रीमंत हार, जास्वंद हार, बाजूबंद, दूर्वा अशा अनेक आभूषणांची सराफांकडे रेलचेल असून चांदीच्या समया, दिवे, वाटी, उदबत्ती घर आदी वस्तूंनाही मागणी आहे. भाव स्थिरावल्याने सोन्यापेक्षा चांदीच्या दागिन्यांना अधिक पसंती दिली जात आहे.

हेही वाचा: पुण्यशलाका’ची काश्मीरमध्ये सायकल राईड

भावांमध्ये चढ-उतार होत असले तरीही गणेशोत्सवासाठी नागरिक चांदी अथवा सोन्याच्या वस्तूंची खरेदी आवर्जून करतात. दागिन्यांमधील गुंतवणूक दीर्घकाळासाठी असल्याने त्यांना यंदाही मागणी कायम आहे. बाप्पासाठी दागिन्यांमध्ये जानवं, किरीट, हार, दूर्वा असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. जानव्यात पिळीचे जानवे, साधे जानवे, हारांमध्ये दगडूशेठ हार, सोनचाफा हार, जास्वंदांच्या फुलांचा हार तसेच दुर्वांची जुडी, किरीट, मुकुट, बाजूबंद असे असंख्य पर्याय आहेत. ५०० रुपयांपासून सुरु होणारे दागिने ४०-४५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. याशिवाय समया, दिवे, वाटी, चमचे, उदबत्ती घर, शंख, विडा, सुपारी मोदक आदी पूजेच्या साहित्याच्या वस्तूही सराफांकडे मिळत आहेत. मोदकांमध्ये ११ मोदकांचा आणि २१ मोदकांचा सेटही मिळत आहे तर चांदीचा आंबा, सफरचंद, केळी व त्यांचे घड, अननस, पेरू असे हटके प्रकारही उपलब्ध आहेत.

हेही वाचा: Pune : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

"सोन्या-चांदीचे दागिने आणि वस्तू घरात असल्या तरी त्यात सणाच्या निमित्ताने भर टाकण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळे खरेदीची वर्दळ कधीच कमी होत नाही. गेल्यावर्षी कोरोनामुळे काहीसा फटका बसला असला तरी यंदा पुन्हा जुन्या उत्साहाने खरेदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे २०-२५ टक्क्यांनी व्यवसायात वाढ झाली आहे."

- वस्तुपाल रांका, रांका ज्वेलर्स

भाव स्थिरावल्याने चांदीच्या वस्तूंना पसंती:

गेल्या काही महिन्यात चांदीचे भाव ७०-७५ हजारांवरून ६५ हजार रुपये प्रति किलोवर येऊन स्थिरावले आहेत. त्यामुळे चांदीच्या वस्तूंना ग्राहक पसंती देत आहेत. दागिन्यांमध्ये नवीन आलेल्या शमीच्या पानांच्या आणि मंदारफुलांच्या हारांना विशेष मागणी आहे, अशी माहिती पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे अमित मोडक यांनी दिली.

loading image
go to top