
पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर, हवेली, शिरूर, दौंड या तालुक्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. मात्र, काही ठिकाणी या पावसाने पिकांचे नुकसान केले.
गराडे : पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी, काळेवाडी, जाधववाडी, दिवे आणि सोनोरी या परिसरात पावसाने दोन दिवस दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे. गेल्या चार- पाच दिवसांपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. तसेच बाजरी, भुईमूग, घेवडा, वाटाणा ही पिके पावसाअभावी करपू लागली होती. पण, पावसाच्या दमदार हजेरीमुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. सोनोरीच्या ओढ्यावर साधारण २२ बंधारे आहेत. या पावसामुळे हे बंधारे भरण्यास सुरु झाले आहे. शेताला सुध्दा तळ्याचे स्वरूप आले आहे. दोन- चार दिवसात सर्व बंधारे भरुन वाहू लागतील. या वर्षी बंधारे लवकर भरल्यामुळे फळबागांना पुढे पाण्याची अडचण येणार नाही, अशी माहिती कृषी पर्यवेक्षक अनिल पाटील व सोनोरीचे माजी सरपंच सतीश शिंदे यांनी दिली.
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील विविध भागात आज वरुणराजाने बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. खरिपाची पेरणी झाल्यानंतर पाऊस झाला होता, परंतु त्यानंतर मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची सुरुवात झाल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, धानोरे, टाकळी भीमा, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, निमगाव म्हाळुंगी, कासारी, कोंढापुरी, रांजणगाव गणपती, खंडाळे, पिंपरी दुमाला, करंजावणे, भांबर्डे, दहिवडी आदी गावात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे विविध पिकांना जीवदान मिळाले आहे.
टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील बहुतेक भागात दोन दिवसांपासून जोरदार सरी बरसत असून, या पावसामुळे पिकांना जिवदान मिळणार आहे. या भागातील बाजरी व कडधान्याची पिके जोरदार आली आहेत. त्यांना भिज पावसाची गरज होती. त्यानुसार गुरूवार (ता. 23) सायंकाळी व शुक्रवारी (ता. 24) दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
राहू : दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील राहू बेट परिसरातील गावांमध्ये काल (ता. 23) सुमारे 56 मिलीमीटर, तर यवत- खामगाव परिसरात 37 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती मंडलाधिकारी विनोद धांडोरे, दीपक कोकरे यांनी दिली.
राहू बेट व खामगाव परिसरात काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री दोन वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरुच होता. बाजरी व चारा पिकासाठी आणि बांधणी करून गेलेल्या उसासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. या पुढेही असाच पाऊस सुरू राहिल्यास नुकतीच आडसाली लागवड केलेल्या उसाचे लहान कोंब जादा पाण्यामुळे कुजून जाण्याचा धोका आहे. मुसळधार पावसामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
या दमदार मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे परिसरातील ओढे, नाल्यांना पूर आल्याने ते खळखळून वाहत आहे. अनेक ठिकाणी बांधबंदिस्ती फुटली असून मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचले आहे. पावसामुळे भुईमूगाच्या शेंगा काढणाऱ्या शेतकऱ्यांची धांदल उडाली. डाळिंबासारख्या पिकांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कृषी विभागाकडून व महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करावा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी फळ उत्पादक शेतकरी अमोल कुल यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.