गुन्हेगारी नियंत्रणास प्राधान्य : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

गुन्हेगारी नियंत्रणास प्राधान्य : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे : ''गुन्हेगारी नियंत्रणास(Crime Control) माझे कायम प्राधान्य असेल, म्हणूनच गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत या वेळी तब्बल ३१ गुन्हेगारी टोळ्यांसह छोट्या-मोठ्या टोळ्यांवरही महाराष्ट्र प्रतिबंधक कायद्यानुसार (मोका) कारवाई केली आहे. भविष्यातही नियोजनबद्ध पद्धतीने संघटित व सराईत गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या जातील, असे पोलिस आयुक्त(Commissioner of Police) अमिताभ गुप्ता(Amitabh Gupta) यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.(Priority to crime control said Commissioner of Police Amitabh Gupta)

प्रश्‍न ः शहरात वाढते गंभीर गुन्हे, खुनाच्या घटना व पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत असताना पोलिस काय कारवाई करीत आहेत?

उत्तर ः खुनाच्या घटना घडल्या, त्यातील आरोपींनाही अटक केली आहे. मात्र वारज्यातील पोलिस अधिकाऱ्याच्या आईच्या खुनाची घटना वाईट होती. त्या आरोपीलाही तत्काळ अटक केली आहे. पण काही ठिकाणी पोलिसही चुकीचे वागत असतील, तर त्यांचे कदापी समर्थन केले जाणार नाही.

प्रश्‍न ः संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून ‘मोका’वर जास्त भर दिला जात आहे का ?

उत्तर ः संघटित गुन्हेगारीच नव्हे, तर छोट्या-मोठ्या व उदयोन्मुख टोळ्यांकडून दहशत निर्माण केली जात होती. संघटित टोळ्यांच्या मुसक्‍या आवळतानाच छोट्या-मोठ्या टोळ्यांवरही जरब बसविण्यासाठी ‘मोका’चा वापर करण्यात आला. आणखी काही टोळ्या आमच्या ‘रडार’वर आहेत.

प्रश्‍न ः पोलिस आयुक्त किंवा वरिष्ठ पोलिस अधिकारी नागरिकांना उपलब्ध होत नाहीत?

उत्तर ः विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल अल्पवयीन मुलीच्या संदर्भातील प्रकरणावर मी लक्ष ठेवून आहे. त्या घटनेत वरिष्ठ संबंधित व्यक्तीला भेटले नसल्याचे मला समजले आहे. मी पोलिस आयुक्तपदी नियुक्त झाल्यापासून पोलिस आयुक्तालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भेटतो. ऑनलाइनद्वारे पोलिस उपायुक्त, पोलिस निरीक्षकही उपलब्ध असतील.

प्रश्‍न ः कोरोनामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर परिणाम होत आहे का? भविष्यात त्यामध्ये बदल करावा लागेल का?

उत्तर ः नागरिकांप्रमाणेच पोलिसांनाही कोरोनाचा फटका बसला. पोलिस कुठेही कारवाईसाठी गेले, तरीही दुसऱ्या दिवशी अनेक जण कोरोनाबाधित होतात. महामारीमध्ये पोलिस यंत्रणा सक्षम असण्यासाठी भविष्यात पोलिसांच्या कार्यपद्धतीसह संपूर्ण व्यवस्थेतच बदल करावा लागेल.

प्रश्‍न ः नव्या पोलिस ठाण्यांचा शहर पोलिस दलात समावेश झाल्यानंतर तेथे काय बदल घडले?

उत्तर : लोणीकंद व लोणी काळभोर ही पोलिस ठाणी शहर पोलिस दलात आली. तेथे सोई-सुविधांचा अभाव आहे, तरीही तेथे गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा अशा विविध शाखा तत्काळ निर्माण केल्या. दिवसाआड सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्तांच्या तिथे भेटी होत आहेत. मी स्वतः आठवड्यातून एकदा तेथे जातो.

प्रश्‍न ः पुणे पोलिस सोशल मीडियावर ॲक्टिव्ह कसे?

उत्तर ः मी प्रारंभी संघटित गुन्हेगारी, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकडे लक्ष दिले. मात्र नागरिकांचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी सोशल मीडिया हेही एक माध्यम आहे. म्हणून आम्ही ट्ठिटरवरद्वारे थेट लोकांशी बोलू लागलो. तसेच इन्स्टाग्रामवर पहिल्यांदाच ‘टॉक शो’प्रमाणे नागरिकांशी संवाद साधला.

मागील पाच वर्षांतील मोका, तडीपार व एमपीडीएची झालेली कारवाई

वर्ष मोक्का एमपीडीए तडीपार

2016 10 20 127

2017 19 20 212

2018 11 10 127

2019 03 18 178

1 ते 31 ऑगस्ट 2020 03 04 88

1 सप्टेंबर ते 11 मे 2021 31 20 122