सावकारीप्रकऱणी दौंडमध्ये बहाद्दराची पोलिस कोठडीत रवानगी 

प्रफुल्ल भंडारी
Friday, 23 October 2020

दौंड शहरात तरूणाला मासिक पंधरा टक्के व्याजदराने १ लाख ९० हजार रूपये देऊन वसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकारास अटक करण्यात आली आहे.

दौंड (पुणे) : दौंड शहरात तरूणाला मासिक पंधरा टक्के व्याजदराने १ लाख ९० हजार रूपये देऊन वसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या खासगी सावकारास अटक करण्यात आली आहे. व्याजासह रक्कम परत केल्यानंतरही सावकाराने साडेसहा लाख रूपयांसाठी तगादा लावला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दौंड पोलिसांनी खासगी सावकार नीलेश उर्फ उमेश केशव गायकवाड (रा. गोवा गल्ली) यास या प्रकरणी अटक केली आहे. सोमनाथ सुरेश खानापूरे (रा. एसआरपीएफ गट सात वसाहत, दौंड) या तरूणाने केश कर्तनालय सुरू करण्यासाठी नीलेश गायकवाड याच्याकडून ६ ऑगस्ट २०२० रोजी टप्प्याटप्प्याने १ लाख ९० हजार रूपये घेतले होते. त्या बदल्यात त्याने नीलेश याला पाचशे रूपयांचा एक मुद्रांक व स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश दिले होते. दरम्यान सोमनाथ खानापुरे याचा केश कर्तनालय टाकण्याचा निर्णय बदलल्याने त्याने सर्व रक्कम २० सप्टेंबर पर्यंत परत केली. 

परंतु नीलेश गायकवाड याने व्याजापोटी एकूण साडेसहा लाख रूपये येणे बाकी असल्याचे सांगत वसुलीसाठी तगादा लावला. रक्कम न दिल्यास सोमनाथ याच्या वडिलांची शासकीय नोकरी घालविण्याची धमकी देत त्याने खुनाची धमकी दिली होती. या त्रासाला कंटाळून सोमनाथ न सांगता घरातून ६ ऑक्टोबर रोजी निघून गेला व कोल्हापूर, पुणे, सातारा व इंदापूर येथे भटकत होता. 

मोठी बातमी : 'सीईटी' परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी!

दौंडमध्ये परतल्यानंतर सोमनाथ खानापुरे याने दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार नीलेश गायकवाड याच्याविरूध्द महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम मधील कलमान्वये बेकायदा खासगी सावकारी करणे तसेच धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड न्यायालयात आरोपी नीलेश गायकवाड यास हजर केले असता न्यायालयाने त्यास २६ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती फौजदार प्रकाश खरात यांनी दिली. 

पुण्यातील प्रकार; कोरोना रुग्णांची आर्थिक लूट करत बिलांत ७८ लाख जादा आकारल्याचे उघड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private moneylender arrested in daund