
- रोस्टरच्या कामाला ठेंगा
- 15 पैकी केवळ दोन विद्यापीठांची माहिती सादर
पुणे : राज्य सरकारकडून उच्च शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरण्यात येत असलेल्या 659 प्राध्यपकांच्या भरतीच्या रोस्टरचे काम विद्यापीठांनी पूर्ण केलेले नसल्याने या भरती प्रक्रियेला खिळ बसली आहे. राज्यातील 15 पैकी केवळ दोन विद्यापीठांनीच ही माहिती सादर केली आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याची आरोड होत असताना दुसरीकडे विद्यापीठांची उदासीनता समोर आली आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
राज्यात मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गोखले अर्थशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज अभिमत यासह 12 अकृषी विद्यापीठांमधील रिक्त पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची एकूण 2 हजार 534 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 1 हजार 388 पदे भरलेली आहेत. 1 हजार 166 पदे रिक्त आहेत. ही सर्व रिक्तपदे एकाच वेळी भरणे शक्य नसल्याने शासनाने 40 टक्के रिक्त पदांची भरती करण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे या विद्यापीठांमधील 659 पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
मराठी अस्मितेचा हुंकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे : शरद पवार
सुमारे सहा महिन्यापूर्वी राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाने या विद्यापीठांना त्यांचे रोस्टरचे काम पूर्ण करून प्राध्यापक भरतीचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते. राज्यातील 15 विद्यापीठांपैकी केवळ बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या दोन विद्यापीठांनी रोस्टरचे काम पूर्ण करून प्रस्ताव पाठविले आहेत.
प्राध्यापक पदभरतीची प्रक्रिया लवकर पूर्ण होण्यासाठी उर्वरीत सर्व विद्यापीठांकडूनही प्रस्ताव दाखल होणे आवश्यक आहेत. मात्र, ते प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयाकडे आले नसल्याने ही प्रक्रिया ठप्प आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.