पुण्यातील बार, रेस्टॉरंट 31 मार्चपर्यंत बंद; 'या' हॉटेल्सना वगळले!

Hotels
Hotels

पुणे : शहरातील बाजारपेठ बंद करण्याच्या निर्णयापाठोपाठ कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील हॉटेल्स आणि बार 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी (ता.१८) दिले. यातून तारांकित हॉटेल्सना मात्र वगळण्यात आले आहे. 

शहरातील कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी पुणे व्यापारी महासंघाने तीन दिवसांचा बंद यापूर्वीच जाहीर केला आहे. शहरातील सुमारे 40 हजार दुकानदार, व्यावसायिक त्यात सहभागी झाले आहेत. हॉटेल संघटनांनीही हॉटेल आणि बार बंद करण्याचे आवाहन संबंधित व्यावसायिकांना केले होते.

या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी आदेश काढला आहे. त्यात म्हटले आहे, की परमीट रूम, बार, पब रेस्टॉरंट परवाने असलेल्यांनी 18 ते 31 मार्चपर्यंत व्यवसाय बंद ठेवावेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार पोलिसांनाही देण्यात आले आहेत. शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये सुमारे तीन हजारपेक्षा जास्त हॉटेल्स आणि बार आहेत. 

कोरोनासाठी खबरदारी घेण्याची जबाबदारी सर्वांचीच असताना, त्यातून तारांकित हॉटेल्सना वगळण्याचे कारण काय, असा प्रश्‍न पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी आणि सचिव किशोर सरपोतदार यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कायदा सर्वांसाठी सारखा असताना त्यात भेदभाव कसा केला जाऊ शकतो, असा प्रश्‍न सरपोतदार यांनी उपस्थित केला आहे. पुण्यामध्ये सुमारे दोन हजार, तर पिंपरी- चिंचवडमध्ये एक हजार हॉटेल्स आणि बार आहेत.

परदेशातून अनेक भारतीय परतत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी केली पाहिजे. कोरोनाला प्रतिबंधासाठीच चित्रपटगृहे, मॉल आणि हॉटेल, बार बंद करण्यात आली आहेत. नागरिक एकत्र बसू शकतील, अशी ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. 
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com