Coronavirus : 'या' रक्तगटातील लोक ठरले सर्वाधिक कोरोनाचे बळी; संशोधकांचा निष्कर्ष!

वृत्तसंस्था
Wednesday, 18 March 2020

जगभरातील सुमारे १,९६,००० लोकांना कोरोनाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यापैकी आतापर्यंत ७८०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

वुहान : चीनमध्ये उद्रेक झालेल्या कोरोना व्हायरसने आता जवळपास निम्म्या जगाला आपल्या कवेत ओढले आहे. भारतातील १४७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. आणि हा आकडा वाढत चालला आहे.  

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमधून कोरोनाने काही अंशी निरोप घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर संशोधकांनी कोरोनाबाबतचे काही रिपोर्ट प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार, ए रक्तगट असलेल्या लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त असल्याचे म्हटले आहे. तर ओ रक्तगट असलेल्या लोकांना कोरोना होण्याची शक्यता कमी असते, असे या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. 

कोरोना व्हायरसच्या उद्रेकाचे मूळ ठिकाण असलेल्या चीनमधील वुहान येथील दोन आणि शेनझेन येथील एका हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांच्या रिपोर्टचा अभ्यास करण्यात आला. कोरोनाग्रस्त असलेल्या २१७३ रुग्णांच्या नमुने तपासण्यात आले. तसेच वुहानमधील ३६९४ संशयित रुग्णांची कोविड-१ ची चाचणी घेण्यात आली.

- Coronavirus : कोरोनापासून बचाव करण्यासाठी क्रिकेटच्या देवाने सांगितला मंत्र!

संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, वुहानमधील चाचणी करण्यात आलेल्या लोकांमधील ३२.१६ टक्के लोक हे ए रक्तगट असलेले होते. बी रक्तगट असणारे २४.९० तर एबी रक्तगट असणारे ९.१० टक्के लोक होते. ओ रक्तगट असलेल्या नागरिकांचे प्रमाण तब्बल ३३.८४ एवढे होते. वुहानमध्ये सर्वात जास्त नागरिक हे ए आणि ओ रक्तगट असणारे आहेत.

तसेच, वुहानच्या दुसऱ्या हॉस्पिटलमधील १७७५ रुग्णांच्या रिपोर्टचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये ३७.७५ टक्के लोक हे ए रक्तगट असणारे होते. तर ९.१० टक्के लोक हे ओ रक्तगट असणारे होते. यावरून असे दिसून येते की, ए रक्तगट असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असून ओ रक्तगट असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. तर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या २०६ रुग्णांपैकी ४१.२६ टक्के रुग्ण हे ए रक्तगट असणारे होते. तर ओ रक्तगट असलेल्या २५ टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

- Coronavirus : आता आणखी एका राज्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

सर्व ठिकाणचे रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यामध्ये ए रक्तगट असणारे लोकच कोरोनाचे जास्त बळी ठरल्याचे दिसून आले. तर ओ रक्तगट असलेल्या रुग्णांची संख्या सर्वात कमी होती. त्यामुळे ए रक्तगट असलेल्या लोकांनी कोरोना होऊ नये यासाठी जास्त खबरदारी घेतली पाहिजे, असे संशोधकांचे म्हणणे असल्याचे न्यूयॉर्क पोस्टने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. 

"जर तुमचा ए रक्तगट असेल, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण ए रक्तगट असलेल्या लोकांनाच कोरोना होतो असेही नाही. आणि ओ रक्तगट असणाऱ्यांना कोरोना होत नाही, ते पूर्णपणे सुरक्षित आहेत, असेही नाही. जर तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल, आणि तुम्ही वारंवार हात धुवत असाल, स्वच्छता राखत असाल, तर कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. मात्र, या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे. याबाबतचे अधिक संशोधन अजूनही सुरू आहे, असे गावो यिंगदाई यांनी म्हटले आहे. 

- Coronavirus : देशात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ; रुग्णांची संख्या...

जगभरातील सुमारे १,९६,००० लोकांना कोरोनाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यापैकी आतापर्यंत ७८०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People with Type A blood more susceptible to corona virus