Big Breaking : पुण्यात कोरोनाचा हाहाकार; नव्या रुग्णसंख्येने आजवरचे सर्व उच्चांक मोडले!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू असतानाच महापालिकेने तपासणी वाढविली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून अडीच हजार लोकांची तपासणी करण्यात येत आहे. ​

पुणे : कोरोना रुग्णांच्या आकड्याने नवा उच्चांक गाठत पुणेकरांना खरोखरीच धडकी भरविली असून, एका दिवसांत सर्वाधिक तब्बल 460 रुग्णांची भर घातली आहे. इतक्‍या प्रमाणात पसरलेल्या कोरोनाने दिवसभरात 12 जणांचा जीव घेतला आहे.

परिणामी, गेल्या पंधरावड्यापासून काहीसा दिलासा मिळालेल्या पुणेकरांत घबराट पसरली आहे. या साऱ्यात 117 कोरोनामुक्तांचा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत पावणेसात हजार रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णसंख्या दहा हजारांच्या पुढे गेली असली तरी प्रत्यक्ष साडेतीन हजार रुग्णांवरच उपचार सुरू आहेत. 

- कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची तडकाफडकी बदली; बदलीचे कारण...!

महापालिकेच्या डॉ. नायडूसह ससून आणि खासगी रुग्णालयांतील 232 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यातील 44 जण व्हेंटिलेटरवर आहेत. सर्व मृत व्यक्तींचे वय 50 पेक्षा अधिक असून, त्यात 10 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या मृतांना कोरोनासह मधुमेह, उच्चरक्तदाब, अस्थमा, हदयरोग असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोंढवा, बिबवेवाडी, हडपसर, पांडवनगर, शिवाजीनगर, कसबा पेठ, पर्वती, दांडेकर पूल या भागातील रुग्ण मरण पावले आहेत.

- 'मीटर रिडींग घेऊ द्या, नाहीतर...'; महावितरण देणार वीजग्राहकांना 'शॉक!'

शहरात गेल्या काही दिवसांपासून रोज सरासरी अडीचशे ते पावणेतीनशे नवे रुग्ण सापडत होते. मात्र, बुधवारी दिवसभरात सर्वाधिक 460 रुग्ण सापडल्याची नोंद झाली आहे. याआधी 422 रुग्ण आढळून आले होते. सध्या रोजच रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांच भीती आहे. त्याचवेळी मृतांची संख्या कमी होईनाशी झाली आहे. 

शहरात आतापर्यंत सुमारे 79 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकीचे 10 हजार 643 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. परंतु, आतापर्यंत 6 हजार 713 रुग्ण ठणठणीत झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 481 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे 3 हजार 449 रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत. 

- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ९७ टक्के एफआरपी रक्कम कारखान्यांनी केली अदा!

कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू असतानाच महापालिकेने तपासणी वाढविली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून अडीच हजार लोकांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, बुधवारी 2 हजार 841 नागरिकांची तपासणी झाली आहे. गेल्या आठवड्यात हा आकडा 1700 ते 2100 इतका होता. तपासणीसोबत रुग्णांवर तातडीने उपचारही करण्यात येत आहेत, असे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune 460 new corona patients found in one day