esakal | बेशिस्त बाजार घटकांकडून 43 हजारांचा दंड वसूल; पुणे बाजार समितीची कारवाई

बोलून बातमी शोधा

बेशिस्त बाजार घटकांकडून 43 हजारांचा दंड वसूल; पुणे बाजार समितीची कारवाई
बेशिस्त बाजार घटकांकडून 43 हजारांचा दंड वसूल; पुणे बाजार समितीची कारवाई
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : कोरोना काळात बाजार समिती प्रशासनाने केलेल्या नियमावलीतील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात पंधरा अडत्यांसह दोन डमी अडत्यांवर मंगळवारी (दि. 20) दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रशासनाने 15 फुटांचे नियमांचे उल्लंघन करणार्‍या 15 अडत्यांसह बंदी असतानाही बाजार आवारात शेतमालाची विक्री करणार्‍या दोन अडत्यांकडून तब्बल 43 हजार 300 रुपयांचा दंड वसुल केला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे फळबाजार विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे आणि तरकारी विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रमुख बाळासाहेब कोंडे, निळकंठ राऊत, दादा वारघडे, दिपक थोपटे, दिपक तांगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. बाजारात 15 फुटांच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे कांदा-बटाटा विभागातील 8 अडत्यांवर कारवाई करत 10 हजार 630 रुपये तर तरकारी विभागातील 7 अडत्यांवर केलेल्या कारवाईतून 20 हजार 880 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तर, बंदी असतानाही फळबाजारात फळांची विक्री करणार्‍या दोन डमी अडत्यांकडून 11 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मार्केटयार्डात शेतमाल खरेदी विक्री व्यवहारासाठी आडते, कामगार, तोलणार, खरेदीदार, वाहनचालक आदींची दररोज सुमारे 20 ते 25 हजार जणांची ये-जा असते. शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यादृष्टीने एकीकडे प्रशासन पोलिसांच्या मदतीने गर्दी कमी करण्याच्या कामात गुंतले असताना बाजार आवारातील काही बाजारघटकांकडून नियमांचे उल्लंघन करत कोंडी करून सोशल डिस्टशिंगला हरताळ फासण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा: Breaking - राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

हेही वाचा: ब्रेकिंग : दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा होणार!

बाजारात आवारातील कांदा-बटाटा, तरकारी व फळ विभागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास आणि वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. परत परत त्याच नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तसेच ही कारवाई सातत्याने सुरू राहील. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती,पुणे

फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा आवक

सोमवारी बाजारात विविध प्रकारच्या ८९४ वाहनातून २२४३१.५० क्विंटल शेतमालाची आवक झाली. सोमवारच्या तुलनेत आवक ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाली.